दुर्गम भागातही घरापर्यंत पाणी आणणार- आदित्य ठाकरे

ठाणे: आपली परिस्थिती पहायला मी आलो आहे. घरापर्यंत पाणी येईल अशी यंत्रणा बसविण्यात येत आहे. कामाच्या पाहणीचा आढावा घ्यायला महिनाभरात परत येईन, अशा शब्दात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माळ, बिवलवाडी, गोलभान या दुर्गम भागातील जनतेला दिलासा दिला.

भर दुपारच्या रणरणत्या उन्हात मंत्री श्री. ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथील ग्रामस्थांशी जमिनीवर खाली बसून चर्चा केली आणि त्यांचा वर्षानुवर्षांचा पाणी प्रश्न मिटेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. बिवलवाडी येथील महिलांनी त्यांना पाणी टंचाईचे गांभीर्य सांगितल्यानंतर सौरऊर्जेच्या माध्यमातून तातडीने पाणीपुरवठा करण्याबाबत आश्वस्त केले.

यावेळी मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, शहापूर, पालघर, ठाणे याभागात पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामुळे दुर्गम भागात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. वन तलाव, विहिरी यांच्या माध्यमातून भावली धरणाचा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत टँकरद्वारे पाणी आणून विहिरीत टाकले जाईल आणि त्यानंतर सोलर पंपने टेकडीवरील गावात पाणी पोहोचविण्यात येईल असे सांगितले.

शहापूर तालुक्यातील माळ त्यानंतर पालघर जिल्ह्यातील सावर्डे येथील ग्रामस्थांच्या भेटी घेवुन मंत्री श्री. ठाकरे यांचे कसारा घाटाच्या माथ्यावर असलेल्या आणि ठाणे जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या बिवलवाडी येथे दुपारी दीडच्या सुमारास आगमन झाले. ४५० लोकसंख्या असलेल्या या गावातील कुडाच्या घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंत्री श्री. ठाकरे यांचे गावातील महिलांनी पारंपरिक लोकगीत म्हणून स्वागत केले.

स्वागताचा कार्यक्रम नको असे म्हणत श्री. ठाकरे थेट जमिनीवर बसले आणि महिलांशी संवाद साधायला सुरुवात केली. या गावात ठाकरे आडनावाच्या कुटुंबियांची संख्या अधिक असल्याने गावातील ज्येष्ठ महिला यांनी पाणी टंचाई बाबत माहिती द्यायला सुरुवात केली. त्यावर तुम्ही पण ठाकरे आणि मी पण..आपण एकत्र काम करून गावाची पाणी समस्या सोडवू. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी भावली धरणाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तो पूर्ण होईपर्यंत या गावची पाणी समस्या सोडविण्यासाठी टोपाची बावडी येथून पाणी लिफ्ट करून आणू. त्यासाठी कामाला सुरुवात देखील झाली आहे. सोलर पंप बसवून पाणी येईल. “ठाकरेंना ठाकरेंचा शब्द” असल्याचे सांगत मंत्री श्री. ठाकरे यांनी महिलांना आश्वस्थ केले.

यावेळी त्यांनी कसारा घाटात असलेल्या आणि अहिल्याबाई होळकरांनी बांधलेल्या टोपाच्या विहिरीची पाहणी केली. या विहिरीत पाणी साठवून ते लिफ्ट करून गावापर्यंत नेण्यात येणार आहे.

त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी गोलभाण येथे भेट दिली. गावातील मारुती मंदिरात त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. आपले म्हणणे ऐकण्यासाठी मी येथे आलोय. प्रशासकीय यंत्रणेने पाणी पुरवठ्याची कामे वेळेत पूर्ण करावी. महिनाभरात आढावा घेण्यासाठी मी येईन असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्या समवेत कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, आमदार रवींद्र फाटक, पांडुरंग बारोरा, सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.