पुढील दोन महिन्यांत भीषण पाणीटंचाईची शक्यता
किन्हवली : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, तानसा आणि वैतरणा यासारखे तलाव असणाऱ्या शहापूर तालुक्यात सध्या पाणीटंचाई सुरू असून ११ गावे व ७५ आदिवासी पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. २३ टँकरने या गाव-पाड्यांना पाणीपुरवठा होताना दिसत आहे.
भातसा नदीतून टँकरच्या माध्यमातून गाव-पाड्यांना पाणी देण्यात येत आहे. मुख्य म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटी पाणीटंचाई असून येणाऱ्या दोन महिन्यात शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाईला जनतेला सामोरे जावे लागणार आहे. उन्हाचा वाढता पारा आणि भीषण पाणी टंचाईमुळे शहापूर तालुक्यातील जनतेचे हाल होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे टॅंकरने पाणीपुरवठा होत असताना टंचाईचा निधी नसल्याने ठेकेदारांना उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे.
दरवर्षी शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई उन्हाळ्यात होत असते या पाणीटंचाई ला रोखण्यासाठी शासनाने भावली योजना मंजूर केली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग व जीवन प्राधिकरणामार्फत नळ पाणीपुरवठा योजना शहापूर तालुक्यात मंजूर करण्यात आल्या आहेत. मात्र या योजनेची कामे सुरू असल्याने या वर्षी शहापूर तालुक्यात पाणी प्रश्न सुटणार नाही. शासनाने यावर्षी टँकर ने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून मार्च अखेर शहापुरात ७५ आदिवासी पाडे व ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे .मात्र पुढील दोन महिन्यात गावाची व पाड्यांची संख्या वाढू शकते. उन्हाचा वाढता पारा, पाण्याची घटलेली पातळी, बोअरवेलचा अभाव, अपूर्ण नळ पाणीपुरवठा योजना यामुळे आगामी काळात तालुक्यात भीषण पाणीटंचाई येऊ शकते. शासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक असून जिल्हा व तालुका प्रशासन व लोकप्रतिनिधीनी खबरदारीची उपाययोजना करणे गरजेचे आहे.