पाणी आंदोलनाचे ‘तुफान आलंया’; भाजपचा हंडामोर्चा ठामपा मुख्यालयावर धडकला

ठाणे: घोडबंदर पट्टा आणि दिव्यातील पाणीटंचाई विरोधात भाजपाने मोठे आंदोलन उभारले असतानाच कोपरीतील पाणी चोरीविरोधात आज भाजपच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा हंडा मोर्चा ठाणे महापालिकेवर धडकला. पालिकेत झालेल्या चर्चेत आयुक्तांनी समान पाणी वाटपाबाबत जातीने लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले.

घोडबंदर पट्ट्यातील पाणीटंचाई विरोधात भाजप आमदार संजय केळकर यांचा लोक चळवळीच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून दिव्यातील पाणी समस्येबाबतही भाजपने ठामपा मुख्यालयावर मोर्चा काढला होता. तर कोपरीत सत्ताधाऱ्यांकडून विशिष्ट भागाला पाणी वळवण्यात आल्याने पाणीटंचाई निर्माण झाल्याचे उघडकीस आले आहे. या विरोधात आमदार संजय केळकर, शहर अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठामपा मुख्यालयावर हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात शेकडो नागरिकांनी विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

मुख्यालयात आयुक्त विपीन शर्मा यांची भेट भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली. कोपरीत सत्ताधाऱ्यांकडून विशिष्ट भागाकडे पाणी वळवण्यात येत असल्याने काही भागात पाणी टंचाई निर्माण होत आहे. पाणी वळवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? संबंधित अधिकारी-कर्मचारी गप्प का? असे प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिष्टमंडळाने केली. आयुक्तांनी समान वाटपाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याची माहिती आ. केळकर यांनी दिली. घोडबंदर पट्ट्यात पुरेसा पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये , अशी मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली. तर कोपरीला मुंबई महापालिकेकडून मिळणार असलेल्या अतिरिक्त पाणी पुरवठ्याबाबतही आयुक्तांना आठवण करून देण्यात आली. घोडबंदर, दिवा आणि कोपरीनंतर विटाव्यातील पाणी टंचाईबाबतही आंदोलन उभे करणार असल्याचे श्री.केळकर यांनी दिली.

मागील सात महिन्यापासून कोपरीत पाण्याची समस्या आहे. ही समस्या मार्गी लागावी यासाठी सध्या शिवसेना विरुध्द भाजप असा सामना रंगत आहे. ही समस्या मार्गी लागावी, कोपरीकरांना समान पध्दतीने पाण्याचे वाटप व्हावे या मागणीसाठी शुक्रवारी महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली. महापालिका मुख्यालयाबाहेर माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

समान पाणीवाटप झाले नाही तर उग्र आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिला.