Thanevaibhav Online
14 September 2023
आदिवासी महिला पंचायत समितीमध्ये आक्रमक
शहापूर: शहापूर तालुक्यातील सारंगपुरी-खैरे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खांडीचा पाडा येथे ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईच्या झळा लागत असल्याने येथील महिलावर्ग आक्रमक झाला आहे.
याच अनुषंगाने १३ सप्टेंबर रोजी येथील आदिवासी महिलांनी थेट शहापूर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागामध्ये दाखल होत संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला. याप्रसंगी ५०हून अधिक महिला भगिनींनी या ठिकाणी असलेली बोरवेल (हातपंप ) वारंवार नादुरुस्त होत असल्याने या गावातील ग्रामस्थांना कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. याठिकाणी असलेला पाण्याच्या हात पंपावरून एक हंडा पाण्यासाठी चार चार महिलांना एकत्र येऊन हा हात पंप खेचावा लागतो. हात पंपाचे जमिनी खालील पाईप गंजल्याने हा हात पंप खेचुन पाणी काढणे म्हणजे इंद्रधनुष्य पेल्याण्याइतके अवघड काम झाले आहे.सदरची कैफियत येथील माजी सरपंच तुळशीबाई भगत, ठमाबाई भगत, गुलाब चौधरी, कल्पना मेंगाळ, आवडी धापटे, सविता गिरा यांच्यासह आलेल्या ५०हून अधिक महिलांनी शहापूर पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडे मांडली.
पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती यांच्याकडे संपर्क साधत आहे. दोन दिवसांपूर्वी हातपंप दुरुस्त करण्यात आला होता. मात्र पाण्याची पातळी खोल गेल्याने हातपंप वारंवार नादुरुस्त होत आहे. त्याचबरोबर जलजीवन मिशन अंतर्गत येथे नवीन पाणी योजनेचे काम सुरु असून ते लवकरात लवकर पूर्णत्वास येणार आहे, अशी माहिती ग्रामसेवक ग्रुप ग्रामपंचायत सारंगपुरी-खैरेचे ग्रामसेवक एस.जी.वंजारी यांनी दिली.
पाणी पुरवठा विभागाचे वाहन नादुरुस्त झाले होते. उद्या तत्काळ हातपंप दुरुस्त करून पाण्याची पातळी खोल गेली असल्यास नव्याने पाईप जोडण्यात येतील, असे पाणी पुरवठा विभागाचे लिपिक किशोर गायकवाड यांनी सांगितले.