अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणामुळेच अंबरनाथला पाणीटंचाई

आमदार किणीकर यांनी सुनावले अधिकाऱ्यांना फटकारले

अंबरनाथ : पुरेसे पाणी उपलब्ध असतानाही अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणी वितरण व्यवस्था ताबडतोब सुधारणा करण्याची आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या अधिकाऱ्यांकडे केली.

अंबरनाथ शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार डॉ. किणीकर यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरल्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी जीवन प्राधिकरण खात्याच्या कार्यालयावर धडक मारून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले.

शहरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून तसेच पावसाळ्यातही पाणी समस्येला सामोरे जावे लागते. नागरिकांच्या सततच्या तक्रारींची दखल घेऊन ‘मजीप्रा’चे अधिक्षक अभियंता तन्मय कांबळे यांची भेट घेऊन शहरातील पाणी वितरणाचा आढावा घेतला.

पाणी खात्याकडून पाणी बिलाची १०० टक्के वसुली होत आहे. शहरासाठी १४० दललि पाणी कोटा मंजूर असतानाही अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना समस्या भेडसावत असल्याचे आमदार किणीकर यांनी निदर्शनाला आणून दिले. पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा होत असल्याने अशा कामगारांना समज द्यावी अथवा त्यांचे निलंबन करावे, अशी मागणी त्यांनी केली. जुन्या गळती होणाऱ्या जलवाहिन्या बदलण्यात याव्यात, आवश्यक यंत्रसामुग्रीची देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत होण्याकडे लक्ष देण्याची मागणी आमदार डॉ. किणीकर यांनी केली.

पश्चिमेकडील हाऊसिंग बोर्ड परिसरात आमदार निधीतून टाकण्यात आलेल्या जलवाहिनीद्वारे एमआयडीसीकडून लवकरच पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती आमदार किणीकर यांनी दिली. मजीप्रातील रिक्त पदे तातडीने भरण्याबरोबर शहरातील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा करून पाणी टंचाई समस्या सोडवण्याची ग्वाही अधिक्षक अभियंता कांबळे यांनी दिली. परशुराम पाटील, संदीप मांजरेकर,प्रमोद चौबे, पुरूषोत्तम उगले, गणेश कोतेकर, सुभाष साळुंके, रवींद्र पाटील, सुषमा रसाळ, सुवर्णा साळुंके, लीना सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.