* महापौरांचे आदेश बासनात
* आडमुठ्या स्टेमविरोधात संताप
ठाणे : स्टेमच्या माध्यमातून ठाण्यातील वागळे इंडस्ट्रियल पट्यात होणाऱ्या पाणीपुरवठ्यात तब्बल १० ते १५ एमएलडी पाणी कमी करून ते मिरा-भाईंदरला वळवण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्टेम प्राधिकरणचे चेअरमन हे स्वतः ठाण्याचे महापौर असून ठाण्याला पाणी वाढवून देण्याचे आदेशही त्यांनी यापूर्वीच स्टेमच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र स्टेमच्या अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत हे पाणी मिरा-भाईंदरकडे वळवले असल्याने एकीकडे ठाणे शहर तहानलेले असताना दुसरीकडे अशाप्रकारे मिरा-भाईंदरला कोणाच्या दबावाने पाणी वळवण्यात आले आहे याबाबत मात्र आता उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रावादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी ठाण्यात वारंवार होत असलेल्या शटडाऊन बाबत समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. ठाणे शहरात वारंवार शटडाऊन घेण्यात येत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी देखील मिळत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर गेल्या एका महिन्यात वारंवार शटडाऊन घेण्यात आले असल्याचेही यावेळी प्रशासनाने कबुल केले. काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांनी देखील शटडाऊन घेण्यात येत असला तरी पाण्याचे नियोजन करण्याचे काम प्रशासनाचे असल्याचे सांगितले.
दुसरीकडे ठाण्यातील वागळे या इंडरस्ट्रियल पट्यात स्टेमकडून १२३ एमएलडी पाणीपुरवठा होत असून यामधून मात्र १० ते १५ एमएलडी पाणी कपात करून ते मिरा-भाईंदर महापालिकेकडे वळवण्यात आले असल्याचेही या स्थायी समितीमध्ये उघड झाले आहे. विशेष म्हणजे महापौर नरेश म्हस्के यांना याबाबत माहिती देखील देण्यात आली होती. त्यानंतर महापौरांनी स्वतः ठाण्याला वाढीव पाणी देण्याचे आदेश स्टेमच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र महापौरांच्या आदेशानंतरही स्टेमच्या अधिकाऱ्यांनी हे पाणी ठाण्याला दिले नसल्याचे स्थायी समितीमध्ये उघड झाले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी-पाचपाखाडी मतदार संघात वागळे इंडस्ट्रियल पट्टा येत असून मिरा-भाईंदर हा भाग शिवसेनेचेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदार संघात येतो. मग नेमके हे पाणी कोणाच्या दबावाने वळवण्यात आले आहे याबाबत मात्र चर्चा रंगू लागल्या आहेत.