७०हून जास्त नागरिकांनी केल्या पाण्याच्या तक्रारी

ठाणे: दाखल जनहित याचिकेची सुनावणी तोंडावर आली असताना ठाणे महापालिकेने तातडीने नागरिकांच्या तक्रारी आज स्वीकारल्या, मात्र केवळ तांत्रिक कारण पुढे करत समितीने तक्रारदारांची बोळवण केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शहरातील पाण्याच्या प्रश्नासंदर्भात तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात सन २०१६ मध्ये घोडबंदर रोडचे रहिवासी ॲड. मंगेश शेलार यांनी याचं विषयावर मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली होती. ही याचिका त्यावेळी ॲड. विजय पाटील यांनी कोर्टात लढविली होती. सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ५ ऑगस्ट २०१७ रोजी ठाणे महापालिकेला नवीन बांधकामांना परवानगी देण्यास मनाई हुकूम जारी केला होता. या जनहित याचिकेच्या अंतीम सुनावणीत हा हुकूम काही अटींसह रद्द करण्यात आला. ठाणे महापालिका, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता (पाणी पुरवठा) व सचिव लीगल सर्व्हिसेस ॲथोरिटी ठाणे जिल्हा यांच्या समितीचे गठन करण्यात येऊन जी समिती महिन्यातून दोन वेळेस बैठक घेऊन सामान्य नागरिकांचे घरगुती पाणी पुरवठ्याबद्दल किफायती ऐकून समस्येचे समाधान करेल. याच अटीवर मुंबई उच्च न्यायालयाने नवीन प्रकल्पांना परवानगी देण्यावरील मनाई हुकूम उठविला होता.

२०१७ साली या समितीची स्थापना करण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. महिन्यातून दोन वेळा नागरिकांच्या पाण्याच्या तक्रारींवर सुनावणी घेऊन यावर उपाय योजना करणे अपेक्षित असताना गेल्या चार वर्षात केवळ दोनच वेळा या समितीच्या माध्यमातून सुनावणी घेण्यात आली असून बुधवारी समितीची दुसरी बैठक पार पडली. मात्र या सुनावणीमध्येही तांत्रिक कारण देऊन नागरिकांची बोळवण केली.

कोर्टाच्या सुनावणीच्या एक दिवस आधी पालिकेची घाई

यापूर्वी कोर्टात दाखल झालेल्या जनहितच्या याचिकेचा आधार घेऊन यासंदर्भात ठाण्यातील दक्ष नागरिक दत्त घाडगे आणि मधु नारायननउन्नी यांनी ठाणे महापालिकेला कोर्टाची नोटीस यापूर्वीच पाठवली आहे. या नोटिसीमध्ये पाणी प्रश्नासंदर्भात खुलासा करण्याचे नमूद केले होते. तसेच अवमान याचिका दाखल करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. आज कोर्टात यासंदर्भात सुनावणी होणार असून सुनावणीच्या एक दिवस आधीच या समितीने सुनावणी घेण्याची लगीनघाई केली असल्याची चर्चा आहे.

टँकर लॉबी अजूनही सक्रिय

बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान चार दिवस पाणी नसणे, कमी दाबाने पाणी येणे, पाणी चोरी अशा अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या. त्यामुळे घोडबंदर पट्ट्यात अजूनही टँकर लॉबी सक्रिय असून विशेष म्हणजे या टँकरमधूनही ठाणे महापालिकेचेच पाणी देत असल्याची माहिती याचिकाकर्ते दत्ता घाडगे यांनी दिली आहे. येत्या ८ दिवसांत या तक्रारींवर उपाय योजना करणे या समितीला बंधनकारक आहे.