शशांक मिस्त्रीचे १४ धावांत चार बळी
ठाणे : ठाणेवैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत ब गटात झालेल्या सामन्यात टेलिपरफॉर्मन्स ग्लोबल बिझनेस संघाने गोदरेज स्टाफ अ संघाचा पाच गडी राखून पराभव केला. टेलिपरफॉर्मन्सच्या शशांक मिस्त्री याने फक्त १४ धावांच्या मोबदल्यात चार गडी बाद केले तर फलंदाजी करताना नाबाद ३१ धावांचे योगदान दिले.
सेंट्रल मैदानात झालेल्या या सामन्यात टेलिपरफॉर्मन्स ग्लोबल बिझनेस संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. टेलिपरफॉर्मन्सच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच गोदारेजच्या फलंदाजांना जखडून ठेवले. शशांक मिस्री याने सात षटकांत १४ धावा देत चार गडी बाद केले. तर अमन वर्मा आणि दीपक लाड यांनी प्रत्येकी दोन तर जयनेश पटेल याने एक गडी बाद केला. गोदारेजच्या विवेक पाटील आणि रवी लक्का यांनी प्रत्येकी २८ धावा केल्या. इतर फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. गोदरेज संघाने २६.५ षटकांत सर्व गडी गमावून १२६ धावा केल्या.
गोदारेजच्या आव्हानाला सामोरे जाताना टेलिपरफॉर्मन्सच्या संघाला पाच गडी गमवावे लागले. टेलिपरफॉर्मन्सच्या श्रवण गावडे आणि अनिकेत सिंग यांनी प्रत्येकी २३ धावा करून विकेट गमावल्या. मात्र गोलंदाजीत चार बळी मिळवून गोदरेज संघाला जखडून ठेवणाऱ्या शशांक मिस्त्री याने सहा चौकारांच्या साह्याने नाबाद ३१ धावा करत संघाला विजयाच्या दिशेने नेले. टेलिपरफॉर्मन्सने २०.४ षटकांत १२९ धावा करत गोदरेज संघावर सहज विजय मिळवला.