ठाण्यात रंगणार वारकरी भजन स्पर्धा

ठाणे : सर्वसामान्यांची आध्यात्मिक ओढ लक्षात घेता व वारकरी मंडळांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ठाण्यात अनोख्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मायमाऊली व दिशा ग्रुप सेवाभावी संस्थांच्या वतीने हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आल्या असून विजेत्या तीन भजनी मंडळांना रोख पारितोषिक देऊन गौरवले जाणार आहे.

ठाण्यातील शिवाईनगर येथे असलेल्या पालिका शाळेच्या पटांगणावर शनिवार १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ ते १० या वेळेत भजन स्पर्धा रंगणार आहे. शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका रागिणी बैरीशेट्टी व दिशा ग्रुपचे कार्याध्यक्ष सागर बैरीशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त दिशा ग्रुपचे संस्थापक भास्कर बैरी शेट्टी यांच्या संकल्पनेतून या अनोख्या स्पर्धेचे मायमाऊली सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष ह. भ. प. अमित महाराज आंग्रे यांनी आयोजन केले आहे. भजनी मंडळांसाठी स्पर्धेची प्रवेश फी विनामूल्य असून प्रथम पारितोषिक विजेत्या मंडळाला रोख ११ हजार, द्वितीय व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या मंडळांना अनुक्रमे साडेसात व पाच हजारांचे बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे. तसेच सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंडळाला आकर्षक बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती दिशा ग्रुपचे संस्थापक भास्कर बैरीशेट्टी यांनी दिली.

भजनी मंडळांच्या वादकांचाही या स्पर्धेत गौरव केला जाणार आहे. उत्कृष्ठ पखवाज व हार्मोनियम वादकांसह उत्कृष्ट गायकाचा यावेळी रोख पारितोषिक देऊन गौरव केला जाणार आहे. ह. भ. प. यशवंत महाराज पाटील, तुकाराम महाराज मोरे, रामचंद्र महाराज जाधव, प्रदीप महाराज गुरव या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.