इच्छुक उमेदवार आणि सर्वपक्षीय नगरसेवकांची उत्कंठा वाढली
ठाणे : आगामी पालिका निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर घेण्यात आलेल्या हरकतींवर २६ फेब्रुवारी रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सुनावणी घेण्यात येणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ठाणे महापालिकेची निवडणूक एप्रिल किंवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्याकरिता प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. १४२ सदस्य असलेल्या महापालिकेकरिता तीन सदस्यांचे ४६ आणि चार सदस्यांचा एक असे ४७ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. महापालिकेने निवडणूक आयोगाकडे हा कच्चा आराखडा पाठवला होता. त्यामध्ये काही फेरबदल करून १ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगाने तो प्रसिद्ध केला होता. त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत १९६४ नागरिकांनी हरकती घेतल्या होत्या. सर्वाधिक ५७८ हरकती नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमधील नागरिकांनी घेतल्या होत्या.
या हरकतींवर २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगातील रवी जाधव, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे आणि इतर एक ते दोन अधिकारी यांची समिती हे ठाणेकरांच्या हरकती ऐकून घेणार आहेत. त्यानंतर २ मार्च रोजी अंतिम आराखडा निवडणूक आयोग जाहीर करेल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
ही प्रभाग रचना चुकीची असून दिवेकरांवर अन्याय झाला आहे अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे तसेच पूर्व भागातील नगरसेवकांची संख्या कमी करून कोपरीतील अस्तित्व संपुष्टात आणण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव असल्याचा आरोप पूर्व भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.