तत्काळ उपाय योजनेसाठी होणार सर्वेक्षण
ठाणे : ठाणे शहरातील उष्णता नियंत्रण कृती आराखडा ठाणे महापालिकेने तयार केला आहे. या आराखड्यात संकलित केलेल्या शास्त्रोक्त माहितीनुसार वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात उष्णतेचा जास्त प्रभाव जाणवणार आहे.
महाराष्ट्र शासन, ठाणे महानगरपालिका आणि काऊन्सिल ऑन एनर्जी, एन्वायर्नमेंट अँड वॉटर यांनी संयुक्तपणे उष्णता उपाययोजना कृती आराखडा तयार केला आहे. यात वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवणार असल्याचे म्हटले आहे.
सन १९४० पासून तापमानाची माहिती, सॅटेलाईट मॅप, झालेली बांधकामे, हिरवळ, विविध गटांमधील लोकसंख्या अशा विविध स्तरांवर माहिती घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. हवेची आर्द्रता ६० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास आणि तापमान ३० अंश असल्यास हे तापमान तीन ते चार अंशाने अधिक जाणवेल असे मत व्यक्त करण्यात आले आहे.
मागील काही दिवसांपासून राज्यात उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्माघाताने मृत्यू ओढवू नयेत यासाठी उपाययोजना आखण्यासाठी राज्य शासन आणि महापालिकेने तज्ञ संस्थेच्या सहकार्याने पुढाकार घेतला आहे. ठाणे महापालिका हद्दीत विविध स्तरावर चाचण्या घेताना वागळे इस्टेट प्रभागात सर्वाधिक उष्णतेचा प्रभाव जाणवेल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने महापालिकेने या प्रभागात उपाययोजना करण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे.
त्या अनुषंगाने, तत्काळ जाणवणाऱ्या उष्णतेच्या धोक्याबाबत नागरिकांसाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे महानगरपालिका, कौन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरोमेंट अॅण्ड वॉटर यांनी तयार केलेल्या प्रश्नावलीनुसार सामाजिक, आर्थिक आणि आरोग्य विषयक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण आशा सेविकांच्या मदतीने झोपडपट्टी, रहिवासी संकुले, शाळा, रुग्णालये येथे २० ते ३० मार्च या कालावधीत होणार आहे. या सर्वेक्षण उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन ठाणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.