ठाणे : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने वडाळा ते कासारवडवली दरम्यान प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो मार्ग ४ च्या १३ मेट्रो स्थानकांसाठी १५६ प्लॅटफॉर्म पिअर कॅप्स (पीपीसी) उभारले आहेत. मुलुंड फायर स्टेशन ते माजिवडा दरम्यान ८४ पीपीसी उभारण्यात आले आहेत. या पीपीसीच्या उभारणीमुळे स्टेशनासाठी टी, एल आणि यु गर्डर्स, प्लॅटफॉर्म स्लॅब, प्लॅटफॉर्मस्तरापर्यंत जिना आदी उभारणे सुलभ होणार आहे, अशी माहिती प्राधिकरणातील सूत्रांनी दिली.
प्राधिकरणामार्फत मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो रेल, उड्डाणपूल, रस्ते सागरी सेतू, मोनोरेल यांसारखे महत्वकांक्षी आणि लोकाभमुख प्रकल्प राबविले जात आहेत. मुंबई आणि ठाणेसारख्या कमी क्षेत्रफळात दाट लोकवस्ती असलेल्या शहरात असे मोठे प्रकल्प राबविताना शहरातील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, अनियमित बांधकामे, अतिक्रमणे यांसारख्या बाबींचा सामना करावा लागतो आहे.
ठाण्यातील मेट्रो मार्गाच्या कामांमध्ये ब-याच वेळा कायदेशीर समस्यांचाही सामना करावा लागतो आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ततेला बरेचदा विलंब आणि प्रकल्पाच्या किंमतीत वाढ होत आहे. या सर्व बाबींमुळे सामान्य नागरिकांचीही गैरसोयदेखील होते. परंतु प्राधिकरणाचे प्रशासन नियमितपणे या गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी सक्षम आहे, असे वरिष्ठ अधिका-यांकडून सांगण्यात आले.
सन २०१८ मध्ये स्थापत्य कामांना सुरू झालेल्या मुंबई मेट्रो मार्ग ४ च्या प्रगतीवर कोविड महामारी तसेच जमीन अधिग्रहणासंबंधित न्यायालयीन खटल्यांमुळे बराच परिणाम झाला होता व प्रकल्पाची प्रगती मंदावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालामुळे या प्रकल्पाला गती देण्यास फायदेशीर ठरेल, असा दावा प्राधिकरणाच्या सूत्रांनी केला.