कारगिल कोंडा येथील ५७८ अतिक्रमणे हटवली

अतिक्रमणांविरोधात वन विभागाने कंबर कसली

ठाणे : पावसाळ्यात डोंगर खचून अथवा दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनेत निरपराध नागरिकांचा बळी जावू नये, यासाठी ठाणे वन विभाग सतर्क झाले आहे. मागील सात ते आठ दिवसांपूर्वी कारगिल कोंडा येथील ४७५ अतिक्रमणांवर कारवाई करीत, ६.५ हेक्टर भूखंड अतिक्रमण मुक्त करण्यात आला आहे. गुरुवारी पुन्हा या ठिकाणी कारवाईची बडगा उगारत ५७८ अतिक्रमणांवर कारवाई करीत, ४.७१० हेक्टर वन जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असल्याची माहिती वन विभागाने दिली.

ठाणे शहराला लाभलेल्या गर्द हिरवाईने नटलेल्या डोंगररांगावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून घरे उभारण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून अनेक नागरिक मृत्यूमुखी पडत असल्याच्या घटना घडत आहेत. याची दखल घेत, यंदा वन विभागाने कंबर कसली आहे. ठाणे उपवनसंरक्षक संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या जागेत बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून राहणाऱ्या झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार मंगळवार १६ मे आणि १७ मे या दोन दिवसात ४७५ अनधिकृत झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करीत ६.५ हेक्टर वन जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली होती. अशातच गुरुवार २५ मे रोजी पुन्हा याच भागातील अनधिकृतपणे नव्याने उभ्या राहणाऱ्या अतिक्रमणांच्या विरोधात पुन्हा कारवाईची बडगा उगारण्यात आला.

यावेळी सहायक वन संरक्षक हिरीजा देसाई, वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश देसले, वनपाल सचिन सुर्वे, वनरक्षक अनिल भामरे तसेच ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागासह पोलीस प्रशासन यांच्या उपस्थितीत ५७८ अनधिकृत झोपड्यांवर वन विभागाच्या माध्यामतून बुलडोझर चालविण्यात आला असून ४.७१० हेक्टर वनजमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे.

यापुढे वन विभागाच्या जागेत उभ्या राहणाऱ्या अतिक्रमणांना वीज जोडणी देवू नये, यासाठी टोरंट कंपनीला तर, नळ जोडणी देण्यात येवू नये याकरिता ठाणे पालिकेला पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती वन विभागाने दिली.