‘योद्धा कर्मयोगी’ चरित्रग्रंथाचे उद्या प्रकाशन

ठाणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या प्रा. डॉ. प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी, ३० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी ५ वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.

‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्याचा लेखाजोखा या ग्रंथात मांडला आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या माध्यमातून हा चरित्रग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या चरित्रग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ लेखक गंगाराम गवाणकर यांच्या हस्ते होणार असून गायक अनुप जलोटा, सोनू निगम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या सोहळ्याच्या निमंत्रकांकडून देण्यात आली.