ठाणे जिल्ह्यातील तरुण मतदारांची मते ठरणार निर्णायक

तीन लोकसभा मतदारसंघात सुमारे साडे अकरा लाख तरुण

कल्याण : देशाच्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचे पडघम जोरदार वाजू लागले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी व ठाणे या तीन लोकसभा मतदारसंघातील १८ ते २९ वयोगटातील तब्बल ११ लाख ४२,४४४ युवा व तरुण मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदार संघातील एकूण मतदार संख्येच्या १७ टक्के मते हि तरुण व युवा मतदारांची आहे. दिल्ली दरबारी खासदार म्हणून निवडून देण्याची निर्णायक भूमिका तरुण व युवा मतदार बजावणार असल्याने युवा व तरुणांची मते कोणाच्या पारड्यात पडतात याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

ठाणे जिल्ह्यात ठाणे भिवंडी व कल्याण असे तीन लोकसभा मतदारसंघातून आहेत. या तिन्ही लोकसभा मतदारसंघातून ६५ लाख १,६७१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युवा व तरुण मतदारांचा मतदानाचा कौल हा निर्णय ठरणार असून देशाचे नेतृत्व तरुणाईच्या हाती असणार आहे.

ठाणे, भिवंडी व कल्याण लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटातील ८२,३२७ मतदार प्रथमच आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर २० ते २९ वयोगटातील १० लाख ६०,११७ युवा मतदार आहेत. नवतरुण व युवा असे १८ ते २९ वयोगटातील ११ लाख ४२ हजार ४४४ तरुण मतदार मतदान करणार आहेत.

सर्वाधिक १८ ते १९ वयोगटातील ३२ हजार ९८ मतदार तसेच २० ते २९ वयोगटातील युवा तीन लाख ८१,९५० मतदार असे एकूण चार लाख १४ हजार ९८ मतदार भिवंडी लोकसभा मतदार संघातील आहेत. ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेत एकूण १७ टक्के मतदार तरुण व युवा वर्गातील असल्याने लोकसभेच्या मतदानाच्या सारी पाटात तरुणाईची मते निर्णायक ठरणार आहेत.