नामसाधर्म्यामुळे मतदारांचा उडणार गोंधळ

चार मतदारसंघात प्रस्थापितांना फटका बसण्याची शक्यता

ठाणे: एकाच नावाचे दोन उमेदवार असतील तर सर्वसामान्य मतदारांचा मोठा गोंधळ उडतो. त्याचा फटका प्रस्थापित उमेदवारांना बसण्याची शक्यता अधिक असते. असेच चित्र मुरबाड अंबरनाथ, बेलापूर आणि ऐरोली या चार मतदारसंघांत पाहायला मिळत आहे.

विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचार फेर्‍यांचा वेग वाढला आहे. मात्र ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी चार विधानसभांमधील दिग्गज उमेदवारांना सध्या नामसाधर्म्याच्या चिंतेने घेरले आहे. अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये या उमेदवारांसमोर आपल्याच नावाचे प्रतिस्पर्धीही उभे ठाकले आहेत. विशेष म्हणचे महाविकास आणि महायुतीमधील उमेदवार किंबहूना शिवसेना शिंदे गटाला मदत होईल अशा ठिकाणीच ही खेळी रंगली असल्याचे दिसते. या नामसाधर्म्याचा फटका उमेदवारांना कितपत बसतो हे आता पाहणे गरजेचे ठरणार आहे.
निवडणूक विभागाकडून अंतीम उमेदवारांची यादी जाहिर झाल्यानंतर नावांमधील हा गोंधळ समोर आला आहे. यामध्ये बेलापूर विधानसभा मतदारसंघाचा विशेष उल्लेख करावा लागेल. या ठिकाणी महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदिप नाईक रिंगणात उतरले आहेत. पण या दोन्ही मातब्बर उमेदवारांना त्यांच्याच नावाच्या दोन उमेदवारांनी डोकेदुखी दिल्याचे दिसते. आमदार मंदा विजय म्हात्रे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत. तर या मतदारसंघात मंदा संजय म्हात्रे या अपक्ष उमेदवार आहेत. दुसरीकडे संदिप गणेश नाईक हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार आहेत. तर संदिप प्रकाश नाईक हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. एकाच मतदारसंघामध्ये दोन्ही प्रमुख उमेदवारांसमोर आपल्याच नावाचे अपक्ष उमेदवार उभे राहिल्यामुळे येथील निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार किसन कथोरे विरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गटचे सुभाष पवार अशी थेट लढत होणार आहे. पण येथे सुभाष पवार नावाचा एक अपक्ष उमेदवारही आपले नशिब आजमावत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचे पूर्ण नाव सुभाष गोटीराम पवार आहे. गोटीराम पवार यांनी मुरबाडचे तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे राजकारण गाजवले होते. त्यामुळे सुभाष पवार यांच्याइतकेच गोटीराम पवार यांचे नाव प्रचलित आहे. पण शरद शांताराम पवार नाव असलेल्या अपक्ष उमेदवारामुळे गोंधळ उडू नये यासाठी ग्रामीण भागामध्ये मेहनत घ्यावी लागणार आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना आहे. येथे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर निवडणूक लढवत आहेत. त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे राजेश वानखेडे तगडी टक्कर देतील असे दिसते. पण वानखेडे यांनाही नामसाधर्म्याचा किंचित फटका बसण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे राजेश देवेंद्र वानखेडे यांच्या विरोधात राजेश अभिमन्यू वानखेडे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या राजेशला ‘देवेंद्र’ तारणार का अशी चर्चा आहे.

कल्याण पूर्वमध्ये मात्र दोन अपक्षांच्या नावात साम्य आहे. येथे भाजपने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे धनंजय बोडारे आहेत. पण शिवसेना शिंदे गटातून बंडखोरी करत अपक्ष उभे राहिलेल्या महेश दशरथ गायकवाड यांना महेश प्रकाश गायकवाड यांचाही समाना करावा लागणार आहे.

योगायोग असा की राजकीय खेळी
निवडणुकीत गोंधळ निर्माण करून प्रतिस्पर्धी उमेदवारांची मते खाण्याचा प्रकार नेहमीच घडतो. ही राजकीय खेळी समजली जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि तुतारीवाला माणूस असा गोंधळ झाला होता. भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळया मामा म्हात्रे यांच्या विरोधात अपक्ष सुरेश म्हात्रे उभे होते. धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादीचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असा असतानही या नामसाधर्म्य असलेल्या अपक्ष उमेदवाराला निवडणूक अधिकार्‍यांनी तुतारीचे चिन्ह दिले. यामुळे उडालेल्या गोंधळात राष्ट्रवादीची हजारो मते अपक्ष उमेदवाराच्या खात्यात गेली असल्याचा आरोपही यावेळी झाला होता.