फ्लॅश मॉबव्दारे मॉलमध्ये मतदार जनजागृती

नवी मुंबई: लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा अधिकार असणा-या नागरिकांनी मतदान करुन मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

यामध्ये नुकताच मतदान करण्याचा अधिकार प्राप्त झालेले पहिल्यांदाच मतदान करणारे 18 वर्षावरील युवक व युवती यांना मतदान करण्याकरीता प्रोत्साहित केले जात असून महाविद्यालयांमध्ये तसेच युवक संघटनांमध्येही मतदार जनजागृती विषयक उपक्रमांवर भर दिला जात आहे.

या अनुषंगाने शनिवार व रविवारी होणारी मॉलमध्ये येणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन वाशी येथील इनॉर्बीट मॉल तसेच सीवूड येथील ग्रॅंड सेंट्रल मॉल या दोन ठिकाणी लोकांना चटकन आकर्षित करुन घेणा-या फ्लॅश मॉब सारख्या संगीतमय कलाप्रकाराचा मतदार जनजागृतीसाठी प्रभावी वापर करण्यात आला.

मॉलमधील वातावरण खरेदीसाठी उत्साही असताना व तशा प्रकारची लगबग मॉलमधील प्रत्येक दुकानातून सुरु असताना अचानक मोठया आवाजात गीत-संगीत वाजायला सुरुवात होते. गाणे कुठे वाजते आहे याचा कानोसा घेत लोक आवाजाच्या दिशेने सूरांचा शोध घेण्यासाठी पुढे येतात. त्यावेळी त्यांना मॉलच्या तळमजल्यावर मधल्या मोकळया पॅसेजमध्ये संगीत वाजायला सुरुवात झाल्याचे लक्षात येते व त्या तालावर नृत्यासाठी सज्ज असलेले तरुण, तरुणी दिसतात. गाणे वाजायला सुरुवात होते आणि त्या तालावर ते तरुण-तरुणी समुहनृत्य सुरू करतात. बघता बघता हे नृत्य पाहण्यासाठी त्यांच्या भोवतालची गर्दी वाढत जाते. सुरूवातीच्या गाण्यानंतर चक्क मतदान विषयक जनजागृती करणारे गाणे सुरू होते. मग मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणारी गाणी एकापाठोपाठ एक नृत्यासह सादर होत जातात. तळमजल्यावरच नव्हे तर मॉलमधल्या प्रत्येक मजल्याच्या कठड्याजवळ येऊन नागरिक तळमजल्यावर नृत्य करणा-या कलावंताकडे आकर्षित होऊन गर्दी करतात.

नृत्याविष्काराच्या अखेरीस 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन मतदान करण्याविषयीचे फलक उंचावत केले जाते. नागरिकही या तरुणाईला प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात त्यांच्या नृत्याचे कौतुक करतात व लोकसभा निवडणूकीत आम्ही मतदान करणार आहोत अशी ग्वाही देखील देतात.

वर्दळीच्या ठिकाणी अचानक सुरु होणारा गीतसंगीतमय फ्लॅश मॉब हा नागरिकांना आकर्षित करणारा व त्याच वेळी मतदानाविषयी जनजागृती करणारा असल्याने हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी झाला.