‘मतदाता ॲप’ जोडणार थेट मतदारांशी नाळ

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण

ठाणे : शासकिय योजना, परिसरातील सांस्कृतिक व नागरी कार्यक्रम, पोलीस ठाणे, मतदान प्रक्रिया व नागरी सुविधांची घरबसल्या माहिती देणाऱ्या ‘मतदाता ॲप’मुळे थेट मतदारांशी नाळ जोडली जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

शिवसेनेचे घोडबंदर रोड भागाचे विभागप्रमुख रवी घरत आणि शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका नम्रता घरत या समाजसेवी दाम्पत्याने जनहितार्थ साकारलेल्या ‘मतदाता ॲप’ चे लोकार्पण श्री.सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक ‘मतदाता ॲप’ जनहिताचे असल्याचे सांगून या माध्यमातून शिवसेनेचे काम थेट जनतेपर्यंत पोहचणार असल्याचे सांगितले. या ‘मतदाता ॲप’द्वारे नागरीकांना ठाणे महापालिकेच्या नवीन योजना तसेच सरकारी योजना कळणार असून कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो याची माहिती मिळणार आहे. महत्त्वाच्या सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती या ॲपद्वारे मिळणार असल्याने नागरिकांना कोणताही सांस्कृतिक किंवा नागरी कार्यक्रम चुकणार नाही. मतदार यादी क्रमांक, मतदान केंद्र, मतदार वोटिंग स्लिप आणि इतर महत्त्वाच्या नागरी सुविधांची देखील या ॲपद्वारे माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे ब्लड बँक, ऍम्ब्युलन्स, पोलीस स्टेशन, फायर ब्रिगेड यासह महत्त्वाचे आपत्कालीन सुविधांचे नंबर आणि रुणालये व वैद्यकिय निधी पुरवणाऱ्याचे पत्ते आणि नंबर देखील या ‘मतदाता ॲप’ मध्ये उपलब्ध केले असल्याची माहिती विभागप्रमुख श्री. घरत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मानपाडा, टिकुजिनी वाडी येथील निलकंठ अनंता बॅक्वेट हॉलमध्ये शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी नगरसेविका आशा डोंगरे, महेश करकेरा, साजन कासार, युवा सेना समन्वयक नितीन लांडगे, प्रियांका मसूरकर, संदीप डोंगरे, विभाग प्रमुख भगवान देवकाते आदी उपस्थित होते.