मुंबई : विवेक फणसळकर यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे उद्या निवृत्त होणार आहेत. आता त्यांच्या जागी फणसळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्तपद हे राज्यातील सर्वांत मानाचे पद मानले जाते. मुंबई पोलीस महासंचालक रजनीश सेठ, विवेक फणसळकर, पुण्याचे पोलीस आयुक्त अभिताभ गुप्ता यांची नावे चर्चेत होती. अखेर फणसळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
फणसळकर यांची 31 जुलै 2018 रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती, त्यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी पाहता राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती. सुमारे पावणे दोन वर्ष त्यांनी ठाणे शहर आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळला. त्यांचा कार्यकाळ 2018 साली संपुष्टात आला होता. कोरोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तव्य बजावताना दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना थेट नियुक्ती पत्र देण्याचा उपक्रम त्यांनी राबविला होता. त्यांच्या या उपक्रमाचं राज्यभर कौतुक झालं होतं.
विवेक फणसळकर हे 1989 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकात अतिरिक्त महासंचालक म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली आहे. आणि त्यापाठोपाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदीही ते होते. कडक शिस्त आणि प्रामाणिकपणा या त्यांच्या गुणांमुळे ते खात्यात ओळखले जातात.