विश्वनाथन देऊन गेला ठाणेकरांना आनंद

रोटरीच्या स्पर्धेत बुद्धिबळ चाहत्यांची मने

ठाणे: ज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बुद्धिबळाच्या पटावर चाली केल्या, त्या चौसष्ट घरांचा राजा, पद्मविभूषण विश्वनाथन आनंद यांच्यासमोर डाव मांडता आला, कानमंत्र घेता आला, ही आमच्यासाठी आयुष्यातली सर्वात मोठी पर्वणी ठरली, अशा भावना २२ बुद्धिबळपटुंनी व्यक्त केल्या.

रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊन आणि अपस्टेप अ‍ॅकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या या एक दिवसीय उपक्रमात 500 जणांसाठी फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धा आणि विश्वनाथन आनंद यांचा एकाचवेळी २२ बुद्धिबळपटुंशी सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यानंतर बुद्धीबळपटुंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

टिपटॉप प्लाझा येथे सकाळी साडेनऊ वाजता स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. याच दिवशी दुपारी २ वाजता विश्वनाथन विरुद्ध २२ हा प्रदर्शनीय सामना कोरम मॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता.

आनंद यांची खेळी बुद्धिबळपटुंना बुचकळ्यात पाडून गेली. मात्र हार-जीतपेक्षा आनंदसोबत खेळायला मिळणे याचा मोठा आनंद खेळाडूंच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहताना दिसत होता. एकेकजण हरत होता, पण चिमुरडा वेद आंब्रे शेवटपर्यंत टिकून राहिला. जवळपास पावणेदोन तास तो आनंदपुढे टिकून राहिला. मुंबईचा वेद आंब्रे, ठाण्याचा अथर्व आपटे आदींनी आनंद यांच्याकडून टिप्स घेतल्या. या स्पर्धेसाठी या क्षेत्रातील खेळाडू, सर्वसामान्य नागरिक आणि क्रीडाप्रेमी यांनी मोठी गर्दी केली होती.

ठाण्यात २२ स्पर्धकांसोबत खेळताना खूप आनंद झाला. विश्वचषक बुद्धिबळात भारतीयांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. प्रथमच आपले चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. सर्वजण अंतिम फेरी गाठण्याची क्षमता राखून आहेत, असा विश्वास विश्वनाथन आनंद यांनी व्यक्त केला.

सुमारे अडीच लाख रुपयांची बक्षिसे आणि 80 मानचिन्हे देऊन फिडे रॅपिड रेटिंग स्पर्धेच्या विजयी स्पर्धकांना गौरविण्यात आले. रोटरीच्या या उपक्रमासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आदी लोकप्रतिनिधींसह ग्रँड मास्टर विष्णू प्रसन्न, अभिजीत कुंटे, दीपेन चक्रवर्ती, इंटरनॅशनल मास्टर रत्नकिरण, शरद टिळक, विक्रमादित्य कुलकर्णी, कुशाग्र कृष्णेतर, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष गिरीश चितळे, कनव्हेनर मिलिंद बल्लाळ, अध्यक्ष मनन वोरा आणि अपस्टेप अकॅडमीचे सलिल घाटे उपस्थित होते.