आयुक्तांनी खुलासा करण्याची भाजपची मागणी
ठाणे : ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असतानाही, शिवसेनेचे माजी महापौर व माजी नगरसेवकांसह स्मार्ट सिटीतील विकासकामांचा दौरा करणारे आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे शिवबंधनात अडकले आहेत का, असा बोचरा सवाल भाजपाचे शहर उपाध्यक्ष सुजय पतकी यांनी विचारला आहे.
स्मार्ट सिटीतून पूर्ण झालेल्या कामांचे श्रेय शिवसेनेला देण्याचा आयुक्त प्रयत्न करीत आहेत का, असा सवालही श्री. पतकी यांनी केला आहे.
ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत कोपरी खाडीलगत वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट अंतर्गत सुशोभिकरणाच्या कामाबरोबरच अन्य कामांची पाहणी करण्यासाठी आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी काल दौरा केला होता. या दौऱ्यात अष्टविनायक चौक ते गणेश विसर्जन घाट, अॅम्पी थिएटर, उद्यान, वाहनतळ, विद्युत रोषणाई , जेट्टी रस्त्याचे नुतनीकरण, ऐतिहासिक तोफांचे जतन करण्याकरिता चौथऱ्याचे बांधकाम, दशक्रिया विधीकरिता चौथरा आदी कामांची आयुक्तांनी पाहणी केली होती. या दौऱ्यात शिवसेनेचे माजी महापौर, शिवसेनेचे काही माजी नगरसेवक सहभागी झाले होते.
महापालिकेवर प्रशासकीय राजवट लागू असताना, आयुक्तांकडून निपक्षपातीपणे कार्य करण्याची आवश्यकता आहे. यापूर्वी ठाणे महापालिकेवर प्रशासकीय राजवट असताना, तत्कालीन आयुक्तांनी कोणत्याही पक्षाला प्राधान्य न देण्याचा नियम काटेकोरपणे पाळला होता. मात्र, काल विद्यमान आयुक्तांनी पाहणी दौऱ्यात शिवसैनिकांना निमंत्रित करून प्रशासकीय धक्का दिला. या दौऱ्याची केवळ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती कळविण्यात आली होती का. आयुक्तांच्या दौऱ्यावेळी पदाधिकारी कसे पोहचले. आयुक्तांनी शिवबंधन बांधले आहे का, असा सवाल श्री.सुजय पतकी यांनी केला आहे. भाजपाचे कोपरीतील माजी नगरसेवक भरत चव्हाण यांना दौऱ्याची माहिती मिळाल्यानंतर ते घाईघाईत दौऱ्याच्या ठिकाणी गेले होते. त्यावेळी त्यांना आयुक्तांचा हा पाहणी दौरा असल्याचे निदर्शनास आल्यावर ते निघून गेले, असे श्री. पतकी यांनी नमूद केले.
स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांबात केंद्र सरकारकडून चौकशी सुरू आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून आता पूर्ण होणाऱ्या कामांचे श्रेय घेण्यासाठी धडपड केली जात आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे पदाधिकारी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचीही जबाबदारी घेणार का, असा सवाल पतकी यांनी केला आहे.
आयुक्त-पदाधिकाऱ्यांचा पूर्वनियोजन करून दौरा
आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दौऱ्यावेळी एकाच वेळी माजी महापौरांसह शिवसेनेचेच माजी नगरसेवक उपस्थित राहतात. हा योगायोग नक्कीच नव्हे, तर शिवसेनेला श्रेय देण्यासाठीच आयुक्तांनी प्लॅनिंग करूनच हा दौरा केला का, असा सवाल श्री. पतकी यांनी विचारला आहे. कामांचे श्रेय घेण्यासाठी धडपड करणारे शिवसेना पदाधिकारी स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचीही जबाबदारी घेणार का? या प्रकारावर आयुक्त शर्मा यांनी खुलासा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दुसरीकडे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपण सुजय पतकी यांच्या टीकेला फारसे महत्व देत नसल्याचे सांगितले. कोण पतकी असे सांगत त्यांनी आधी महापालिकेची निवडणूक लढवून दाखवावी, निवडून यावे मगच महापालिकेच्या कारभारावर टीका करावी, असा टोला लगावला आहे.