पर्यावरणाच्या सानिध्यात काही क्षण घालवण्याचा बऱ्याच जणांचा कल असतो. पर्यटनामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. पर्यटन हा केवळ देशातील विविध भागांची आणि संस्कृतींची ओळख करून देणारा अनुभव नसून तो आपल्या जीवनातील नवे अनुभव, नवे मित्र आणि नव्या आठवणी घडवणारा एक सुंदर प्रवास असतो. भारतातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या हिमाचल प्रदेशमधील किन्नौर आणि स्पिती व्हॅली येथे फिरायला जायचा प्लॅन करू शकता. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात, तरीही येथील वातावरण शांत आणि स्वच्छ आहे. माथ्यावर भव्य मोकळं आकाश आणि खाली पसरलेला तेवढाच विशाल भू-प्रदेश, माणसाचं अस्तित्व जणू नगण्य असल्याचं भासत राहतं. प्रत्येक कोपऱ्यात निसर्गाचा आनंद उत्तम प्रकारे दिसून येतो. कुटुंब, मित्र किंवा तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही येथे जाऊ शकता.
किन्नौर आणि स्पिती व्हॅली येथे निसर्गाने मुक्तहस्ताने रंगाची उधळण केली आहे. निळा-हिरवा प्रवाह घेऊन धावणाऱ्या इथल्या नद्या, धवल मुकुट धारण केलेले पर्वत. चकाकणारे ग्लेशर्स, हिरव्यागार दऱ्या, नीलवर्ण आकाश आणि अनंत रंगांत नटलेली जमीन. वसुंधरेच्या सौंदर्याची जणू सगळी रूपं इथे न्याहाळायला मिळतात. ताजेपणाची जाणीव क्षणाक्षणाला करुन देणारा प्रदेश म्हणजे हिमाचलचा किन्नौर जिल्हा. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला एकदा सोडल्यावर शहर आणि गजबजाट यापासून दूर स्वप्नवत गावात घेऊन जाणारा हाच तो प्रदेश. हिमाचलचं खरंखुरं सौंदर्य न्याहाळण्यासाठीच तर इथे जायचं.
ब्रिटिश काळापासून शिमल्याला ‘क्विन ऑफ हिल्स’ असं म्हणत असले तरी ते शहर सोडल्यावर आपण खऱ्या अर्थाने राजा असतो. या देवभूमीवर जसजसे आपण पुढे जातो तसतसे आपसूकच या प्रदेशाच्या प्रेमात पडतो. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी उंचच उंच पाईन आणि सूचिपर्णी वृक्षांची दाटी न्याहाळत, कधी दूरवर दिसणारी पर्वतरांग कॅमेऱ्यात बंदिस्त करीत आपण किन्नौर जिल्ह्यात कधी येऊन पोहोचलो हे कळतसुध्दा नाही. याच मार्गावर पुढे असलेलं हातू पीक हे तिथलं उंच शिखर आपल्याला खुणावत असतं. नजर निववणारी हिरवाई आणि हातू पीक येथून दिसणारा देखावा पाहून मन प्रसन्न होतं. गर्द वनश्री, डोंगर उतारावर कसणाऱ्या हातांनी केलेली शेती, सफरचंदानी लगडलेली झाडं, अनेकरंगी फुलं आणि हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा, हिमालयाची अनेकविध रुपं पाहताना आपण हरखून जातो. ११ हजार फुटांवर हे ठिकाण सोडताना तिथला निसर्ग नजरेत आणि कॅमेऱ्यात भरुन घेत पावलं पुढच्या प्रवासाकडे वळतात. याच हातू पीकावर १८१५ साली शूर गुरख्यांनी ब्रिटिशांविरुध्द आपली अखेरची लढाई लढली होती.
सतलज नदीचा जोरदार आणि खळाळता प्रवाह पार करत आपण सरहान या गावात येऊन पोहोचतो. बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेलं हे गाव आणि तिथलं भव्य भिमाकाली मंदिर पाहताना आपल्याला वेगळ्याच जगात येऊन पोहोचल्याचा साक्षात्कार होतो. ५१ शक्तिपीठापैकी एक असलेलं हे मंदिर पूर्वीच्या बुशाहार संस्थानाचं दैवत असून त्या संस्थानाची सरहान ही राजधानी होती. भिमाकाली मंदिर हे सतलज व्हॅलीमधील उत्तम लाकडी काम असलेलं सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या आवारातच रघुनाथ, नरसिंह आणि पाताळभैरव या देवतांची मंदिरही आहेत. याच गावातून हिमालयातील श्रीखंड शिखराचं सुंदर दर्शन घडतं.
किन्नौमधील स्वप्नातलं वाटावं असं गाव म्हणजे सांगला गाव. एखादा जास्तीचा दिवस काढून मुद्दाम इथे थांबावं आणि इथल्या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटावा असं हे गाव. सांगला हे गाव हिमालयाच्या कुशीतच विसावलेलं आहे. धकाधकीच्या शहरी जीवनापासून कोसो दूर असलेल्या या गावातला प्रत्येक क्षण अगदी लक्षात राहण्यासारखा असतो. तिथलं पुरातन नाग मंदिर, गावातील घरं, हिरव्यागार निसर्गाचं दैवी वरदान लाभलेलं हे गाव खरच देवभूमी आहे. सांगलाच्या जवळच असलेला तिबेटी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे कामरु फोर्ट. सांगला व्हॅलीच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा हा पुरातन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या किल्ल्याच्या तिसऱ्या मजल्यावर विराजमान झालेल्या कामाक्षी देवीच्या मूर्तीमुळे आता जुना इतिहास मागे पडून ते कामाक्षी देवीचं मंदिर बनलं आहे. छायाचित्रणाच्या दृष्टीने महत्वाची सांगला व्हॅली, तिचं प्रसन्न करणारं लॅण्डस्केप आणि हवा तसा वाव देणारं हे ठिकाण आहे.
काझाच्या जवळच असलेलं किब्बर गाव हे जगातलं सर्वात उंचीवरचं कायम राहत्या वस्तीचं गाव म्हणून प्रसिध्द आहे. सुमारे चारशे लोकवस्ती असलेलं हे गाव मोटर वाहतुकीच्या रस्त्याने जोडलेलं आहे. स्पितीमध्ये इतर सर्व ठिकाणी मातीच्या विटांपासून बनवलेली घरं आहेत मात्र हे गाव त्याला अपवाद आहे. इथे मिळणाऱ्या दगडापासून ही घरं बनवली गेली आहेत. याच परिसरात असलेली की मॉनेस्ट्री तिच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे आणि आजुबाजूला असलेल्या पर्वतामुळे कायमची लक्षात राहते. एक हजार वर्ष जुनी असलेली गुंफा किल्ल्यासारखी असून दोन-तीन मजली इमारत या ठिकाणी आहेत.
हिमाचल प्रदेश म्हणजे फक्त हिरवागार निसर्ग असं जे आपलं मत असतं ते त्याच राज्यातील लाहोल स्पिती या जिल्ह्याला भेट दिल्यानंतर बदलतं. हिमालयाच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग असलेल्या देवदार वृक्षांची येथील अनुपस्थिती, इथला राकट रांगडा प्रदेश, वैराण पण मावळतीच्या आकाशातील रंगाशी स्पर्धा करणारे मातीचे रंग या आपल्या आगळ्यावेगळ्या सुंदरतेने भरुन काढतो आणि तिथला आसमंत न्याहाळताना त्याचं स्वर्गीय सौंदर्य आपल्याला चकित करुन टाकतं. हिमाचल प्रदेशाच्या पूर्वोत्तर भागात तिबेटला लागून स्पितीचा अर्थच मधली भूमी. तिबेटला लागून असल्याने या भागवार बौध्द धर्माचा पगडा आहे. परतीच्या प्रवासात कुनझुंम पास पार करुन रोहतांग पासमार्गे मनालीच्या दिशेने आपण पुन्हा हिरवाईकडे परततो. परतीच्या मार्गावर असलेला चंद्रताल लेक पाहताना अजून हिमाचल पाहायचा आहे हे लक्षात येतं. या तलावातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह आपल्या दृष्टीने बाहेर पडतो पण तलावात येणारं पाणी दिसत नाही. तलावात खालच्या बाजूलाच हे झरे असावेत.
हिमाचल प्रदेशची स्वर्गीय भूमी, तेथील देवदार, पाईन, सूचिपर्णी वृक्ष, मनमोहक फुलं, सहस्रावधी धबधबे, खळाळत्या नद्या, विस्तीर्ण तलाव असा नेत्रदीपक देखावा पाहण्याबरोबरच स्पिती व्हॅलीमुळे लडाखसारख्या प्रदेशाच्या दर्शनाचा लाभ आपणाला या ठिकाणी गेल्यावर घेता येतो हे या सफरीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. हिमालयाचं कितीही वर्णन केलं आणि फोटो काढले तरी तिथे प्रत्यक्ष गेल्याशिवाय त्याच्या भव्यतेची, सौंदर्याची, रौद्रपणाची कल्पना येणार नाही. माणसाला इवलसं असल्याची जाणीव करुन देणारा श्रीखंड पर्वत, किन्नौर कैलास शिखर याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी तिथेच गेलं पाहिजे.
आत्माराम परब, ईशा टूर्स