प्रत्यक्ष संवाद वाढला तर स्क्रीनटाइम कमी होईल

* जय हिंद कॉलेजच्या संचालिका डॉ. राखी शर्मा यांचे प्रतिपादन
*
* महिला दिनानिमित्त व्हिजनरी वुमन अवॉर्ड्स सोहळा आणि परिसंवाद

* वाविकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांचा संयुक्त उपक्रम

ठाणे : मानवी संपर्क आणि संवाद कमी झाल्यामुळे मुले मोबाईलशी संवाद साधू लागली आहेत. पालकांचा आणि मुलांचा संवाद वाढला तर स्क्रीन टाईम नक्की कमी होईल, असे प्रतिपादन जय हिंद कॉलेजच्या संचालिका डॉ. राखी शर्मा यांनी केले.

महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. वाविकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘व्हिजनरी वुमन अवॉर्ड्स 2025’ आणि परिसंवाद हा विशेष सोहळा ७ मार्च रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी जय हिंद कॉलेजच्या संचालिका डॉ. राखी शर्मा, यूरो स्कूलच्या प्राचार्या डॉ. ज्योत्सना मायादास, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विलोना अनुसिएशन आणि रिस्पॉन्सिबल नेटिझमच्या संस्थापिका सोनाली पाटणकर उपस्थित होत्या. या विशेष सोहळ्यात ‘मुलांच्या मानसिक स्वास्थ्य, पालकत्व आणि सोशल मीडियाच्या प्रभावा’ वर परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादात सन्मानप्राप्त महिलांनी त्यांची परखड मते मांडली. यावेळी महिला संचलित सहा स्वयंसेवी संस्थांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

डॉ. राखी शर्मा पुढे म्हणाल्या, आपण सर्व एकाच इकोसिस्टमचा भाग आहोत, जिथे सर्वांना फोन वापरणं आवश्यक झाले आहे. पण त्याचवेळी आपण सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या खूपच आहारी गेलो आहोत. त्यामुळे मानवी संवाद खुंटला असल्याची खंत डॉ. शर्मा यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात वाविकर आय इन्स्टिट्यूटचे प्रमुख डॉ.चंद्रशेखर वाविकर, सरस्वती शाळेच्या संचालिका मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ, ‘ठाणेवैभव’चे उपसंपादक निखिल बल्लाळ उपस्थित होते. यावेळी इनरव्हील क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेटच्या अध्यक्षा श्रीजा नायर, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे शायनिंग स्टार्सच्या अध्यक्षा अर्चना नायर, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे हिल्सच्या अध्यक्षा नीना मनचंदा, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे लेक सिटीच्या अध्यक्षा नेहा हजारे, इनरव्हील क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनच्या अध्यक्षा सुप्रिया देशपांडे, लायन्स क्लब ऑफ कोपरीच्या अध्यक्षा सोनल कद्रेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महिलांनी समाजसेवा, शिक्षण, आरोग्य आणि डिजिटल सुरक्षितता यांसारख्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. हा कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला असून, महिला सबलीकरणाच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल ठरला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋजुता देशपांडे यांनी केले.

यूरो स्कूलच्या प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना मायादास म्हणाल्या, स्क्रीन हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. स्क्रीन टाईम बंद करा असे म्हणता येणार नाही, मात्र त्यावर नियंत्रण ठेवणे आपल्या हातात आहे. ते कशाप्रकारे आणि किती वापरायचे याचे योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. कोणत्या कामांसाठी स्क्रीनला प्राधान्य दिले पाहिजे, ते ठरवणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी मांडले.

विधायक पद्धतीने स्क्रीनचा वापर केला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. पण आपल्या सर्वांगीण विकासासाठी स्क्रीनवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. प्रत्येक पिढी मागच्या पिढीपेक्षा अधिक हुशार होताना आढळून येते. त्यांचा भावनिक भागफल ( Emotional Quotient) देखील वाढत आहे पण ही पिढी तंत्रज्ञानाचा अतीवापर करत आहे, त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष संवाद साधणे कठीण होत चालले आहे, असे स्पष्ट मत मानसोपचार तज्ञ डॉ. विलोना एनूनसीएशन यांनी मांडले.

आज भारतात तीनपैकी एक मुल सायबरपीडित आहे. वय वर्ष दोनपासून आपण स्क्रीनचा उपभोग घेत असतो, त्यामुळे सर्व वयोगटातील लोक आज पीडित आहेत. परिस्थिती भीषण आहे, गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आयक्यू, ईक्यूबरोबर टीक्यू (Technical quotient) बद्दल देखील आता चर्चा होऊ लागली आहे. तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञान आत्मसात करणे तसेच योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगून नेटिजम संस्थेच्या सहसंस्थापक सोनाली पाटणकर यांनी आमच्यासारख्या संस्था यावर सतत जनजागृती करत असल्याची माहिती दिली.

“मुलांबद्दल आणि बालपणाबद्दल दररोज चर्चा करताना तुलना होते, पण गोष्टी बदलत आहेत, आणि आपण त्यांना तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहू शकत नाही. शिक्षकांना देखील बदलण्याची आवश्यकता आहे. एका शाळेचा अध्यक्ष म्हणून मी शिक्षकांना आणि पालकांना नेहमी सांगतो की मुलं शाळेत काही तास असतात, पण ते कुटुंबासोबत जास्त वेळ घालवतात. पूर्वी मुलांना ‘कसे विचार करावे’ हे शिकवले जात होते, पण आज पालक मुलांना ‘काय विचार करायचे’ हे सांगत आहेत, जे चुकीचे आहे. पालकांना मुलांच्या संगोपनासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे,” असे ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांनी सांगितले.

डॉ.चंद्रशेखर वाविकर म्हणाले, कोविडच्या काळात आम्हाला लक्षात आलं की खूप मुलं डोळ्यांच्या कोरड्या होण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. पण कोरडे डोळे ही समस्या प्रामुख्याने वृद्ध व्यक्तींमध्ये, म्हणजे 50 वर्षांवरील लोकांमध्ये दिसते. हे मुख्यतः स्क्रीनचा वापर जास्त होण्यामुळे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहेत. त्यांना मायोपिया (दूरदृष्टी) ची समस्या वाढत आहे. हे देखील स्क्रीन वेळेच्या वाढीमुळे आहे, असे डॉ. वाविकर यांनी सांगितले.

‘ठाणेवैभव’ आणि वाविकर आय इन्स्टिट्यूटतर्फे नेहमीच विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मुलांचे स्वास्थ्य, पालकत्व आणि सोशल मिडियाच्या वाढत्या प्रभावामुळे होणारे दुष्परिणाम यामुळे संगोपन सध्या आव्हानात्मक झाले आहे. त्यामुळे या पाश्वभूमीवर खास हा परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादामुळे महिला आपली पुढील वाटचाल ठरवू शकतील आणि खऱ्या अर्थाने एक आनंदी आयुष्य जगू शकतील. त्याचबरोबर आपले खासगी तसेच व्यावसायिक आयुष्य सांभाळत सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या महिला संघटनांचा आम्हाला विशेष आदर आहे. या निमित्ताने त्यांचा देखील आपण सन्मान करीत आहोत, असे मत ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी व्यक्त केले.