बलुचिस्तानमध्ये निवडणुकीआधी हिंसाचार शिगेला

अपक्ष उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर बॉम्बस्फोट, १२ ठार

कराची : पाकिस्तानमध्ये गुरुवारी (८ फेब्रुवारी) सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. मतदानाच्या एक दिवस आधी अशांत बलुचिस्तान प्रांतात एका अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाबाहेर मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात १२ जण दगावले आहेत, तसेच ३२ जण जखमी झाले आहेत.

बलुचिस्तान प्रांतातील पिशीन जिल्ह्यातल्या खानोजई भागात हा स्फोट झाला आहे. येथील अपक्ष उमेदवार असफंदयार खान यांच्या कार्यालयाबाहेर काही अज्ञातांनी भीषण स्फोट घडवून आणला.

पांगुरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी अब्दुल्ला जेहरी यांनी स्फोटात १२ जण मृत्यूमुखी पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. असफंदयार खान यांच्या कार्यालयाबाहेर टायमर लावून बॉम्ब ठेवला होता. गुप्तचर यंत्रणा, संरक्षण यंत्रणेला या बॉम्बचा सुगावा लागू शकला नाही. परिणामी दहशतवादी हा स्फोट घडवून आणण्यात यशस्वी झाले. ८ फेब्रुवारी रोजी देशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तत्पूर्वी बलुचिस्तानमधला हिंसाचार शिगेला पोहोचला आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने या स्फोटाबाबतची माहिती मागवली आहे. निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी निवेदन जारी करत म्हटलं आहे की, बलुचिस्तानचे मुख्य सचिव आणि पिशीनच्या पोलीस निरीक्षकांकडे या घटनेसंबंधीचा अहवाल मागवला आहे. तसेच हा स्फोट घडवून आणणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस आणि संरक्षण यंत्रणा सध्या स्फोटाची माहिती गोळा करत आहेत.