भाईंदर: पश्चिम रेल्वेतर्फे विरार आणि बोरीवली दरम्यान ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे भूसंपादन केले जाणार असून या कामामुळे पाच गावे बाधित होणार आहेत. मात्र या ‘भूसंपादनासाठी कुठलीही हरकत आणि सूचना प्राप्त न झाल्याने भूसंपादन प्रक्रिया सुरू करत असल्याने रेल्वेने प्रसिद्ध केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.
रेल्वेने अंधारात ठेवून आम्हाला माहिती दिली नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. रेल्वेच्या या भूमिकेविरोधात स्थानिक एकत्र येऊन लढा उभारण्याचा निर्णय घेत आहेत.
पश्चिम रेल्वेवरील विरार-बोरिवली दरम्यान नव्याने ५ आणि ६ क्रमांकाची मार्गिका टाकली जाणार असून ३० ट्रेकचे यार्ड तयार केले जाणार आहे. यामुळे वसई पश्चिमेकडील उमेळे, उमेळमान, दिवाणमान, माणिकपूर आणि नवघर या गावातील घरे बाधित होणार आहेत. यामध्ये जवळपास ७५ वर्षापूर्वीचे चर्च, १०३ वर्षापूर्वीचे देऊळ आणि जवळपास १०० वर्षापूर्वीची घरे बाधित होणार आहेत. दुसरीकडे वसई स्थानक, उमेळमान, दिवाणमान, माणिकपूर येथील अनेक इमारतीही बाधित होणार असून त्याचा फटका येथील नागरिकांना बसणार आहे.
याबाबत भूसंपादनासाठी जाहिरात काढण्यात आली होती, परंतु त्याबाबत येथील नागरिकांना कोणती माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. रेल्वेने मात्र या भूसंपादनाच्या जाहिरातीवर एकही हरकत न आल्याने या ठिकाणी आता भूसंपादनाचे काम हाती घेण्याबाबत जाहिराती दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी एकत्र येत या विरोधात लढा देण्याचे जाहीर केले आहे.
सोमवारी समितीच्या शिष्टमंडळाने वसई प्रांतअधिका-यांची भेट घेऊन विरोध केला. रेल्वेने केलेल्या भूसंपादनाबाबत येथील नागरिकांना, महापालिकेला अथवा तहसील कार्यालयाला माहिती दिली नसल्याचे नायगांव येथील ग्रामस्थांनी सांगितले. रेल्वेने सातबाराच्या आधारे बाधित ग्रामस्थांची नावे जाहीर केली आहेत. मात्र इमारती आणि घरांमधील रहिवाशांना व्यक्तिशा कळविणे आवश्यक होते, असे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले. रेल्वेने या कामाच्या प्रक्रियेला सुरवात केली असून त्याचा एक भाग म्हणून जुना अंबाडी पूल निष्काषित करण्यासाठी बंद केला आहे.