भाईंदरमध्ये होणाऱ्या मेट्रो कारशेडला गावकऱ्यांचा विरोध

भाईंदर – मीरा भाईंदर मध्ये दहिसर पासून मेट्रो ट्रेन येत असून सध्या याचे काम जोरात सुरू आहे. या मेट्रोची कार शेड भाईंदर पश्चिमेच्या राई येथे उभारण्यात येणार आहे. कारशेड बांधताना मुर्धा, मोर्वा, राई या तीन गावातील गावकऱ्यांच्या जमिनी आणि राहती घरे जात असल्यामुळे मेट्रो कारशेडला गावकऱ्यांनी विरोध केला आहे. सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत राई येथे एका सभेचे आयोजन केले होते.

मिरा-भाईंदर शहरात दहिसर चेकनाका ते सुभाषचंद्र बोस मैदानपर्यंत मेट्रो येणार असून शेवटचे स्टेशन याच ठिकाणी तयार करण्यात येणार होते.  मात्र मेट्रोचे एक स्टेशन पुढे वाढवत मुर्धा गावापर्यंत नेण्यात आले आहे. यामध्ये मूर्धा, मोर्वा, राई या गावातील गावकऱ्यांच्या शेतजमिनी व काही गावकऱ्यांची राहती घरे जात आहेत. मेट्रो कारशेड, रेल्वे वर्कशॉप तसेच कारशेडला येण्यासाठी मेट्रो रेल्वे उत्तन रस्त्याने आणण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात गावकऱ्यांनी एकत्र येत भूमि अतिक्रमण विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच कायदेशीररित्या लढा देण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत आदर्श विद्या मंदिर, राई येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते.  या सभेत ऍड. विजय गाडगे, रविंद्र भगत, प्रियंका ठाकुर, रमाकांत पाटिल, राजेंद्र मढवी, संतोष पवार, सुरेश रानडे, सुधाकर पाटील, ऍड. सुरेश ठाकूर, ऍड. गोड फ्राय पिमेंटो अशा नामवंत व तज्ज्ञ मंडळींनी  उपस्थित राहून पुढील लढ्याविषयी मार्गदर्शन केले. या सभेला काही सामाजिक संस्था देखील उपस्थित होत्या अशी माहिती भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्थेच्या सचिव जागृति म्हात्रे यांनी दिली.

यावेळी सर्व मंडळींनी स्वतःच्या हाताला काळ्या फीत बांधून मेट्रो कारशेडचा निषेध केला. कारशेडसाठी पर्यायी जागा कोणत्या ठिकाणी उभारता येईल यासाठी जागेची पाहणी केली. सरकारी जागा व मोकळ्या जागा, पाणथळच्या जागा, राधास्वामी सत्संग अशा अनेक पर्यायी जागा कारशेड उभारण्यासाठी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांच्या जमिनी व गावातून कारशेड न नेता यावर पर्यायी मार्ग काढावा अन्यथा लवकरच एम.एम.आरडीएच्या कार्यालयाबाहेर तीनही गावाचे नागरिक  रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत मोर्चा काढतील असा इशारा देण्यात आला.