कल्याण-पडघा रस्त्यातील खड्ड्यांमध्ये ग्रामस्थांची मासेमारी

कल्याण : कल्याण-पडघा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असून येथील सावद गावातील ग्रामस्थांनी भूमिपुत्र पार्टीच्या माध्यमातून या रस्त्यामधील खड्ड्यांमध्ये मासेमारी करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला आहे. तर येथील खड्डेमय रस्त्यांची त्वरित दुरूस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भूमिपुत्र पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शातांराम म्हात्रे यांनी दिला आहे.

मुंबई-नाशिक महामार्गाला जोडणारा कल्याण-पडघा हा मार्ग असून भिवंडी मार्गे वळसा घालून जाण्याऐवजी वाहनचालक या रस्त्याची प्रवासासाठी निवड करत असतात. यामुळे दररोज लाखो वाहने येथून ये-जा करतात. पडघा आणि आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गोडाऊन असल्याने येथील कामगार वर्ग देखील याच रस्त्याचा उपयोग वाहतुकीसाठी करतात. मात्र पावसामुळे येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असून अनेक अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत. तर तीन जणांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तर अनेकांना कमरेचे आणि मणक्याच्या आजारांनी ग्रासले आहे.

यामुळे नागरिकांना होणाऱ्या या त्रासाबद्दल भूमिपुत्र पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे आणि ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शांताराम म्हात्रे यांनी या रस्त्याची पाहणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करण्यासाठी या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात गळाच्या सहाय्याने मासेमारी केली. दरम्यान त्वरित या रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भूमीपुत्र पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.