ग्रामविकास अधिकारी आणि शिपायाला लाच घेताना अटक

Thanevaibhav Online

22 September 2023

ठाणे : तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतचे शिपाई यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. आरोपी लोकसेवक सुनिल पाटील (५३) हे ग्रामविकास अधिकारी असून, अमित दुबळा (३५) आहेत.

या गुन्ह्यातील तक्रारदार हे प्लंबिंग कंत्राटदार आहेत. त्यांनी ग्रुप पंचायत झाई बोरीगावच्या हद्दीत डिसेंबर २०२२ पर्यंत काम केले होते. त्यांनी केलेल्या कामाचे बिल तक्रारदारांना मिळाले. तक्रारदाराने केलेल्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी आणि बिलाची रक्कम तक्रारदाराला आगाऊ मिळवून देण्याकरीता लोकसेवक क्र. एक यांनी तक्रारदारांना केलेल्या मदतीचा मोबदला /बक्षिसी म्हणून तक्रारदारांकडे पाच हजार रुपये रकमेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदारांनी २० सप्टेंबर २३ रोजी पालघर एसीबीच्या कार्यालयात फोनद्वारे तक्रार दिली.

तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने २१ सप्टेंबर २३ रोजी पंचासमक्ष आलोसे हे लाचेच्या रकमेची मागणी करतात किंवा कसे याची पडताळणी केली. तक्रारदारांनी ग्रुप ग्रामपंचायत झाई बोरीगावच्या हद्दीत केलेल्या कामाचे बील संमत करण्यासाठी आणि बिलाची रक्कम तक्रारदाराला आगाऊ मिळवून देण्याकरीता लोकसेवक क्र. १ यांनी तक्रारदार यांना केलेल्या मदतीचा मोबदला, बक्षिसी म्हणून तक्रारदारांकडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

लाचेची रक्कम मागणी आरोपी क्र. दोन याच्याकडे देण्यास सांगितले असता आरोपी क्र. दोनने लाचेची रक्कम स्विकारण्यास सहमती दिली. ती रक्कम तक्रारदार यांना ग्रामपंचायत कार्यालयातील काउंटरवर ठेवण्यास सांगून स्विकारली असता, दोन्ही आरोपींना दुपारी १२.५० वाजताच्या सुमारास पालघर कार्यालयाच्या सापळा पथकाकडून रंगेहात पकडण्यात आले आहे, अशी माहिती पालघरच्या एसीबीचे उपअधिक्षक दयानंद गावडे यांनी दिली.