गौराई आली सोनपावलांनी

Thanevaibhav Online

22 September 2023

१४,८४५ गौरी स्थानापन्न

ठाणे: ठाणे शहरासह पोलिस आयुक्तालय क्षेत्रामध्ये यंदा १४,८४५ गौरींचे आगमन झाले आहे. तिची विधीवत प्रतिष्ठापना केल्यानंतर उद्या शुक्रवारी गोडधोड आणि पंच पक्वान्नाचा बेत आखण्यात आला आहे. रात्र जागवण्यासाठी झिम्मा फुगडीसह पारंपारिक खेळाचीही मजा लुटण्यात येणार आहे. त्यामुळे एकंदरीत महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण  दिसून येत आहे.

कोणाच्या घरी एक गौरी तर कोणाच्या घरी दोन गौरी व त्यासोबत त्यांची लहान मुले अशी गौराई बसविली जाते. ज्यांच्या घरी गौरी आणण्याची पद्धत आहे, तिथे बाप्पासोबत गौराईच्या आगमनाची तयारीही केली जाते. कुठे मुखवट्यांची गौरी, कुठे तेरड्याची तर कुठे मूर्ती बसवण्याची पद्धत आहे. गणेश चतुर्थीच्या तिसर्‍या दिवशी गौरीचे आगमन होते. त्यानुसार गुरुवारी सकाळपासून गौरीच्या आगमनाची व तिला सजविण्यासाठी महिलांची लगबग दिसून आली.

आपली गौरी छानच दिसावी, ती सर्वांपेक्षा सुंदर दिसावी असा अट्टाहास महिलांचा दिसला. जरीपदराची साडी, बाजूबंद, लक्ष्मीहार ,कमरपट्टा, बोरमाळ  तसेच विविध प्रकारचे दागिने घालून सजवताना महिलांच्या आनंदाला व उत्साहाला उधाण आले होते.  गौरीसाठी घरोघरी पारंपारिक पद्धतीने छान आरास, सजावट केल्याचेही दिसून आले. काहींनी झोपाळ्यावर बसलेली गौरी तर कोणी जात्यावर धान्य भरडताना दाखवलेल्या दोन गौरी असे वेगवेगळे प्रकार केले आहेत. काहींनी गावरान पद्धतीसारखे गौरीच्या समोर पायर्‍या करून त्यावर १५ ते २० खाद्यपदार्थ  ठेवले आहेत.

काकडीचे वडे अन् वाटाण्याची उसळ,
स्वागताच्या दिवशी सुका फराळ तिच्या समोर ठेवण्यात आला आहे. पण उद्या शुक्रवारी तिची विधीवत पूजा झाल्यानंतर पुरणपोळ्यांसह काकडीचे वडे, वाटाण्याची उसळ, भोपळ्याची भाजी, नारळाच्या करंज्या, उकडीच्या करंज्या असा बेत घरोघरी आखण्यात आला आहे. ज्यांच्या घरी गणपती नाही, पण गौरी आहे, अशा काहींच्या घरी ‘तिखटा’चा नैवद्य दाखवण्याची पद्धत आहे.

परिमंडळानुसार गौरी
ठाणे- १,७२६
भिवंडी- ५७३
कल्याण- ६१०७
उल्हासनगर- ४४४६
वागळे- १९९३
एकूण १४, ८४५