Thanevaibhav Online
22 September 2023
माजी मंडल अध्यक्ष मुंडे यांचे आरोप
ठाणे : दिव्यात रोहिदास मुंडे यांना मंडल अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षातील अनेक महत्वाच्या गोष्टी आधीच मित्रपक्षाला समजत असल्याचा गंभीर आरोप करत याची चौकशी करून भाजपचे ठाणे अध्यक्ष संजय वाघुले यांना अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांच्या मागणीमुळे पक्षपातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांची भाजपच्या ठाणे अध्यक्षपदी वर्णी लागली असली तरी त्यांच्या अध्यक्षपदावरून सुरुवातीपासूनच राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. वाघुले यांचे शिवसेनेच्या (शिंदे गट ) पदाधिकाऱ्यांसोबत सुरुवातीपासूनच चांगले संबंध असल्याने ते अध्यक्षपदावरून पक्षाला किती न्याय देतील असा देखील प्रश्न भाजपच्याच गोटातून उपस्थित करण्यात आला होता. दिव्यात आधीच भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) विरोधात भाजपचे दिव्याचे माजी मंडल अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी रान उठवले होते. दिव्यातील अनधिकृत बांधकामांवरून त्यांनी अनेकवेळा शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यात दोन्ही पक्ष सरकारमध्ये सामील असल्याने मुंडे यांच्या आंदोलनाची म्हणावी तशी दखल भाजपच्या पक्षश्रेठींकडून घेतली गेली नाही. मात्र दिव्यात शिवसेना आणि भाजपमध्ये विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना रोहिदास मुंडे यांना मंडल अध्यक्षपदावरून दूर केल्यानंतर हा वाद अधिक तापला आहे.
पदावरून दूर केले याबाबत आपले काहीच म्हणणे नाही, मात्र मला दूर करून हे पद सचिन भोईर यांना देण्यात येणार असल्याची माहिती दोन महिने आधीच मित्र पक्षाला कशी मिळते असा गंभीर आरोप मुंडे यांनी केला आहे. निरंजन डावखरे अध्यक्ष असताना अशा बातम्या कधीच मित्रपक्षाकडे जात नव्हत्या. ठाण्यात जर भाजपला आणायचे असेल तर या सर्व प्रकरणाची चौकशी करून संजय वाघुले यांना पदावरून हटवण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात संजय वाघुले यांच्याशी संपर्क साधला असताना वाघुले हे गणपती दर्शनात व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.