ठाणे: ठाणे शहराचे सांस्कृतिक वैभवाची प्रचिती करून देणारा तसेच बहुप्रतिक्षित ११ वा विहंग-संस्कृती आर्ट फेस्टिवल २०२५ यंदा दिमाखात आयोजित करण्यात आला आहे.
१० ते १३ जानेवारी २०२५ पर्यंत ठाण्यातील उपवन तलाव परिसर येथे हा फेस्टिवल होणार आहे. याची सविस्तर माहिती विहंग संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे चेअरमन आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विहंग संस्कृती आर्ट फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत. या फेस्टिवलमध्ये संगीत, नृत्य आणि वाद्य यांचा अनोखा संगम पाहण्यास मिळणार आहे.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ फेस्टिवलमध्ये दोन प्रवेशद्वारांना त्यांची नावे देण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना यावेळी अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्कृती आर्ट फेस्टिवल २०२५ या वर्षी अधिक आकर्षक आणि बहुरंगी स्वरूपात साजरा केला जाणार आहे. तरंग रंगमंच, मुद्रा स्टेज, विरासत स्टेज असे रंगमंच कलाविष्कारासाठी उपलब्ध करून दिले आहेत. महोत्सवामध्ये स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचे सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हस्तकला प्रदर्शन, कार्यशाळा आणि विविध मनोरंजनाचे उपक्रम यांचा समावेश असणार आहे.
पद्मश्री शुभा मुदगल, विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर, पंडित रितेश-रजनीश मिश्रा, संजू राठोड, अभिजीत भट्टाचार्य, पंडित ब्रिज नारायण, केतकी माटेगावकर, पद्मश्री शाहीद परवेज, मिका सिंग, रणजीत रजवाडा आदी मान्यवर गायक व वादक यंदाच्या फेस्टिवलमध्ये आपली कला सादर करणार आहेत. कुचीपुडी, भरतनाट्यम्, ओडिसी, मणिपुरी आदी शास्त्रीय नृत्यांबरोबर विविध राज्यातील लोकनृत्यांचा आनंदही रसिकांना येथे घेता येणार आहे. बदलत्या ठाण्याचे स्वरुप या फेस्टिवलमधून अनुभवता येईल.
संस्कृती आर्ट फेस्टिवल हा ठाणेकरांसाठी एक महत्त्वाचा सांस्कृतिक सोहळा असून, यंदा हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून ठाण्याची सांस्कृतिक ओळख अधिक गडद होईल, तसेच पर्यटकांचे आकर्षणही वाढेल. सर्व ठाणेकरांनी आणि पर्यटकांनी या फेस्टिवलमध्ये आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले.