कल्याण : कल्याण-शिळफाटा रस्त्यालगत गेल्या वर्षी २८ मे रोजी मौजे काटई येथे १७७२ मीमी व्यासाची बारवी गुरूत्व वाहिनी फुटल्यामुळे येथील स्थानिकांची राहती घरे व दुकानांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भात कल्याण तहसील कार्यालयामार्फत दोन वेळा पंचनामे करण्यात आली. तेव्हा एमआयडीसी डोंबिवली विभागाचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. आज या दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण व्हायला आले तरी नुकसानग्रस्तांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही.
ज्या जमिनीमधून जलवाहिनीचे काम सुरू आहे त्या कल्याण-शिळफाटा रस्त्यातील बाधीत जमीनीचा पूर्वी मोबदला दिला आहे किंवा कसे याबाबत राज्य शासनामार्फत गठीत केलेल्या समितीचा अहवाल तयार करण्याचे काम एमएसआरडीसीकडून सुरू आहे. तसेच कल्याण-शिळफाटा सहापदरी रूंदिकरणात बाधीत जमीनमालकांना मोबदला मिळण्याच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालायात रिट याचिकासुद्धा दाखल आहे.
नुकसान भरपाई जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या जलवाहिनीचे काम थांबवावे यासाठी आज नुकसानग्रस्तांनी महामंडळाच्या संबंधीत कार्यालयांना निवेदनं दिली आहेत.
जलवाहिनीचे काम अत्यावश्यक सेवेमध्ये आहे. परंतु जलवाहिनी फुटल्याने झालेली नुकसान भरपाई मिळणे हा नुकसानग्रस्तांचा संविधानिक अधिकार आहे. त्यामुळे या जलवाहिनीचे कामही व्हावे आणि नुकसानग्रस्तांना भरपाई सुद्धा मिळावी यासाठी महामंडळाने तातडीने हालचाली सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी केली आहे.