काही गाणी अशी असतात, जी नुसती कानावर पडली तरी थेट हृदयापर्यंत पोहोचतात आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही पुन्हा ताठ कण्याने उभं राहण्याचं बळ देतात. ‘इतनी शक्ती हमें देना दाता’ या गाण्याला ज्यांच्या अमोघ वाणीने साज चढवला आणि अनेकांना आयुष्याच्या कठीण प्रसंगी आशेचा मार्ग दाखवला त्या श्रीमती पुष्पा पागधरे आपल्या या वर्षीच्या झी महागौरव पुरस्कार सोहळ्यातील जीवनगौरव पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.
पुष्पाताईंनी लोकप्रिय भजन गायक असलेल्या आपल्या वडीलांकडून, श्री. जनार्दन चामरेंकडून संगीताचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पुष्पाताईंनी भजनं, ठुमऱ्या, सुगम संगीतात प्राविण्य मिळवायला सुरुवात केली. प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांच्याशी भेट झाल्यावर पुष्पाताईंच्या सांगितिक कारकिर्दीला कलाटणी मिळाली. वसंत देसाईंनी पुष्पाताईंना योग्य मार्गदर्शन केलं आणि किराणा घराण्याचे महान गायक अब्दुल रेहमान खानसाहेब यांच्याकडे संगीताचे धडे गिरवायलासुद्धा पाठवलं.
राम कदम यांच्या ‘देवा तुझी सोन्याची जेजूरी’ या गाण्यापासून पुष्पाताईंनी चित्रपटासाठी गायनाला सुरुवात केली. आणि दादा कोंडकेंच्या, ‘सोंगाड्या’ या चित्रपटातील ‘राया मला पावसात नेऊ नका!’ या गाण्यामुळे पुष्पाताईंचा आवाज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचला. दर्याला तुफान आयलंय भारी, दिल झूम रहे मस्ती में अशी महम्मद रफी साहेबांसोबतची त्यांची गाणी तर विशेष गाजली. मराठीमधील सर्वच महान संगीतकारांबरोबर पुष्पाताईंनी काम केलं. ओ. पी. नय्यर, कुलदिप सिंह, सी. रामचंद्र, इकबाल कुरेशी, आलोक गांगुली अशा अनेक संगीतकारांनी त्यांच्या गीतांसाठी पुष्पाताईंच्या आवाजाचा आग्रह धरला.
ही शक्ती आहे, पुष्पा पागधरे या अद्वितीय गायिकेच्या आवाजाची,
ही शक्ती आहे कठोर परिश्रमातून कमावलेल्या गात्या गळ्याची,
ही शक्ती आहे, प्रामाणिकपणे केलेल्या संगीत सेवेची!
तुमच्या या महान कारकिर्दीला ‘झी मराठी’ वाहिनीचा मानाचा मुजरा!
हा अनमोल क्षण पाहण्यासाठी बघायला विसरू झी महागौरव २०२२ रविवार २७ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर