ठाणे : राजकीय नेत्यांना ठाण्यात प्रवेश बंदी करण्याबरोबरच राजकीय सभा आणि कार्यक्रम घेऊ नये यासंदर्भातील निवेदन द्यायला गेलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
शहर आणि जिल्हा बंदीच्या मागणीवर नरेश म्हस्के यांनी आक्षेप नोंदवल्याने मराठा कार्यकर्ते आणि म्हस्के यांच्यात काही प्रमाणात वाद झाला. उपोषणस्थवळावर राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड चालतात मग ठाण्यातील मंत्री आणि राजकीय नेते का नकोत? असा प्रश्न म्हस्के यांनी उपस्थित केला. मराठा समाजाला इतर नेते चालत नसतील तर तुमच्या व्यासपीठावर राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे मग हे आंदोलन महायुती विरोधात महाविकास आघाडीचे आहे का? असा गंभीर आरोप यावेळी नरेश म्हस्के यांनी यावेळी केला. म्हस्के यांनी आमचे काहीच एकूण घेतले नसल्याचा आरोप मराठा समाजच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केले आहे. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यातही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शासकीय विश्राम गृह या ठिकाणी साखळी उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनादरम्यान राजकीय नेत्यांनी गावबंदी करण्यात आली आहे. तर या दरम्यान राजकीय सभा आणि कार्यक्रम घेऊ नये अशी मागणी देखील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची आहे. यासंदर्भातील निवेदन देण्यासाठी ठाण्यातील मराठा कार्यकर्ते शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांना आनंद आश्रम या ठिकाणी द्यायला गेले असता मराठा कार्यकर्त्यांच्या या मागणीवर नरेश म्हस्के यांनी आक्षेप घेतला. तुमच्या यावरून दोघांमध्ये शाब्दिक खटके उडाले.
शरद पवार यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी-नरेश म्हस्के
आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत. मुख्यमंत्र्यांची हीच भूमिका आहे. मात्र शरद पवार यांनी तरी जरांगे पाटील यांच्या मागणीशी मी ठाम आहे अशी भूमिका मांडली आहे का? जरांगे पाटील जे म्हणत आहेत त्याप्रमाणे आरक्षण द्यावे ही भूमिका पवार यांनी मांडली आहे का? हा प्रश्न आधी जितेंद्र आव्हाडांना विचारावा. इथे आम्हाला विरोध करणार आणि आंदोलनाच्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांना घेऊन बसणार ही दुटप्पी भूमिका कशाला? अशी टीकाही श्री.म्हस्के यांनी केली.