ठाणे: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाने रिगल क्रिकेट क्लबचा तीन धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित पाचव्या अर्जुन मढवी स्मृती महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धची उपांत्य फेरी गाठली. दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनच्या ९ बाद २६० धावांचा पाठलाग करताना रिगल क्रिकेट क्लबचा डाव ७ बाद २५७ धावांवर मर्यादित राहिला.
प्रथम फलंदाजी करताना पूनम राऊत आणि सामन्यात सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या क्रितीका कृष्णकुमारने अर्धशतक झळकावत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन संघाच्या धावसंख्येला आकार दिला. पूनमने ५१ आणि क्रितीकाने ५७ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. अदिती सुर्वेने ४७ आणि अनिशा शेट्टीने ४१ धावा केल्या. चेतना बिष्ट, गौरी कदम आणि गौरी मांजरेकरने प्रत्येकी दोन बळी मिळवले.
उत्तरादाखल सृष्टी नाईकने दणकेबाज अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाची आस दाखवली. तिने नऊ चौकार मारत ८२ धावा बनवल्या. ती बाद झाल्यावर जेटसून चिने ४८ आणि आकांक्षा मिश्राने ३३ धावा करत संघाला विजयाच्या नजीक नेले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अर्धशतक करणाऱ्या क्रितीकाने दोन बळी मिळवत गोलंदाजीतही आपली उपयुक्तता सिद्ध केली. खुशी गिरी, सारा सामंत आणि अनिशा शेट्टीने प्रत्येकी एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक: दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन: ४० षटकात ९ बाद २६० (पूनम राऊत ५१; चेतना बिष्ट २/४५) विजयी विरुद्ध रिगल क्रिकेट क्लब: ४० षटकात ७ बाद २५७ (सृष्टी नाईक ८२; क्रितीका कृष्णकुमार २/५४)
सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू : क्रितीका कृष्णकुमार (दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन)