जांभळी नाक्यावरील कोंडीने नागरिक त्रस्त
ठाणे: तलावपाळी येथिल भाजी मार्केटमध्ये भाजी घेऊन येणारे भाजीचे ट्रक ठाणेकर चाकरमानी यांची डोकेदुखी ठरली आहे. रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या ट्रकमुळे चाकरमान्यांना सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून अनेकांना लेट मार्कचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याकडे वाहतूक विभागाच्या पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी ठाणेकरांकडून होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, तसेच जांभळी नाका परिसरातील भाजी विक्रेत्यांची भाजी, फळे घेऊन नाशिक, पुणे, नवी मुंबई, तसेच ठाणे ग्रामिण भागातून पहाटे ४ पासून ट्रक, टेम्पो तलावपाळी येथे येतात. हे ट्रक रस्त्यावर उभे केले जात असल्याने सकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत भाजीचे ट्रक येथे उभे असतात त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाहनांच्या रांगा लागत असतात. या वाहतूक कोंडीत बस आणि रिक्षाने कामावर जाणारे चाकरमानी अडकत असतात. परिणामी त्यांची नेहमीची लोकल चुकून कामावर जाण्यासाठी त्यांना उशिर होत आहे. हे चित्र रोजचेच झाले असून सकाळी एकही वाहतूक पोलिस त्या ठिकाणी उभा नसतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. ट्रक आणि टेम्पो चालकांना याबाबत विचारणा केली असता ते नागरिकांशी हुज्जत घालतात.
वर्तमानपत्रांचे ठाण्यातील मुख्य विक्रेते अरविंद दातार यांनी ही समस्या ‘ठाणेवैभव’च्या निदर्शनास आणली असून वाहतूक विभागाच्या पोलिसांनी या भाज्यांच्या वाहनांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी त्यांना भाजी उतरवण्यासाठी दुसरीकडे जागा द्यावी, अशी मागणी देखिल श्री. दातार यांनी केली आहे.