ठाणे जिल्ह्यातील नवीन सर्वेक्षणात बाब उघडकीस
ठाणे: ठाणे जिल्ह्यात विविध घरकुल योजनांच्या माध्यमातून १०० टक्के घरकुलांना मंजुरी देण्यात आली असली तरी नवीन सर्वेक्षणात ३९ हजार नागरिक घरकुलापासून वंचित आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या विविध कामांच्या आढावा बैठकीत ही बाब समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या तालुक्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत पंतप्रधान आवास योजना राबवण्यात येत असून प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्यातील १८,२४८ घरकुलांचे उद्दिष्टे देण्यात आले आहे. त्यापैकी १७,९७५ लाभार्थी घरकुलांसाठी पात्र झाले असून त्या १७,९७५ पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाला असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी बैठकीत माहिती दिली. तर आठ हजाराहून अधिक लाभार्थ्यांना दुसरा हप्ता देखील देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यावर मंत्री गोरे यांनी पहिला हप्ता दिलेल्या लाभार्थ्यांपैकी किती घरकुलांची कामे सुरु झाली अथवा सुरूच झाली नाही, याची माहिती विचारली असता, प्रशासनाकडून कोणतेच अपेक्षित उत्तर देण्यात आले नाही. तसेच मनुष्यबळाचे मस्टर तयार करण्यात आले का? असा सवाल देखील उपस्थित केला. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने मंत्री गोरे यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यामतून एका वर्षात एका राज्याला ३० लाख घराचे उद्दिष्ट मिळाले नव्हते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे मिळाले. त्यातील पहिल्या टप्प्यात २० लाख घरांची मान्यता देण्याचे काम विक्रमी वेळेत करण्यात आले असून १० लाख ५० हजार घरांना पहिला हप्ता देण्याट आला असल्याचे देखील मंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले. तसेच आता नव्याने १० लाख घरे मंजूर झाली असून वर्षानुवर्षे घरांची प्रतीक्षा असलेली घरांची यादी देखील संपली असल्याचे सांगत ठाणे जिल्ह्यात ती शून्य असल्याचे सांगत जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या नवीन सर्व्हेक्षणात ३९ हजार नागरिक घरापासून वंचित असल्याचे सांगत या सर्वाना प्रधानमंत्री आवास योजनेत घरे उपलब्ध करून देणार असल्याचा विश्वास देखील मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.