ठाणे : मराठी रंगभूमीवर अजरामर झालेले वासूची सासू हे नाटक नव्या स्वरूपात पुन्हा रंगमंचावर अवतरले आहे. अभिजात प्रोडक्शन आणि व्यास क्रिएशन्स प्रकाशन संस्थेने या नाटकाला पुनरुज्जीवित केले आहे. या नाटकाद्वारे व्यास क्रिएशन्सने नाट्य क्षेत्रात पदार्पण केले आहे. ठाणे, डोंबिवली, पार्ले, पिंपरी चिंचवड, पुणे येथील शुभारंभाच्या प्रयोगाला नाट्य रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. कोरोनानंतर हाऊस फुल्ल गर्दी या प्रयोगाला लाभली आहे.
अभिजित केळकर, आकाश भडसावळे, तपस्या नेवे, संजना पाटील, अंकुर वाढवे, अथर्व गोखले या नव्या दमाच्या कलाकारांचे प्रेक्षक भरभरून कौतुक करीत आहेत. सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, विनोदाचे टायमिंग, एनर्जी, दुर्गेश मोहन यांचे दिग्दर्शन आणि संकेत पाटील यांचे संगीत संयोजन, यामुळे नाटक अधिक प्रभावी असल्याची प्रतिक्रिया रसिक प्रेक्षक देत आहेत. सर्वच प्रयोगांना साहित्य, संस्कृती, नाट्य, सिने क्षेत्रातील नामवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रात या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग करण्याचा मानस निर्मात्या वैशाली नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केला.