ठाणे : शहरातील मराठी शाळांची पटसंख्या घसरत असताना शहापूर तालुक्यातील वासिंद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्रशाळेची पटसंख्या पाच वर्षांत दुप्पट झाली आहे. शाळेचे डिजिटलायझेशन, अध्ययन-अध्यापनात विविध तंत्रज्ञानाचा वापर आणि शाळेतील आनंदी वातावरण ही या यशामागील कारणे असल्याचे प्रशासनाने सांगितले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळा अनेकानेक उत्तम कामगिरीसाठी चर्चेत असताना जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, वासिंद शाळेची सध्या ४७० इतकी पटसंख्या आहे. पहिली ते पाचवीचे एकूण दहा वर्ग असून मागील पाच वर्षात पटसंख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम शाळेत राबविण्यात आले आहेत.
शाळा डिजिटल करण्यात आली असून विविध तंत्रज्ञानाचा वापर अध्ययन-अध्यापनात करण्यात येतो. यामुळे विद्यार्थी आनंदाने ज्ञानग्रहण करू लागले आहेत. शालेय वातावरण आनंददायी करण्यात आले असून विद्यार्थांना शिकण्याची गोडी निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत.
सन २०२३- २०२४ या वर्षात तीन विद्यार्थी गुणवत्ता वाढवून शिष्यवृत्ती परीक्षेत 17 विद्यार्थी पात्र ठरले. सात विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. एक विद्यार्थी नवोदय पात्र ठरला आहे. मंथन स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी केंद्र, विभाग स्तरावर प्रथम आले असून शाळेच्या विकासात पालक, माजी विद्यार्थी, अनेक सामाजिक संस्था यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे शाळेची पटसंख्या गेल्या पाच वर्षात दुप्पट करण्यात यश मिळाले आहे.
पाच वर्षांतील पटसंख्या
सन 2023-2024 मध्ये 470 पटसंख्या, सन 2022-2023 मध्ये 460 पटसंख्या, सन 2021-2022 मध्ये 380 पटसंख्या, सन 2020-2021 मध्ये 290 पटसंख्या, सन 2019-2020 मध्ये 247 पटसंख्या आहे.
केंद्र प्रमुख पांडुरंग शिर्के, मुख्याध्यापक रविंद्र पवार, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश भंडारी आणि सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य या सर्वांच्या पुढाकाराने शाळेची पटसंख्या वाढ होत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा वासिंद शाळेची स्थापना सन १८७५ साली झाली असून शालेय वातावरण खूपच सुंदर व आनंदायी आहे. शाळेत सर्व आधुनिक सुविधा मुलांना उपलब्ध आहेत. शाळेत शिक्षक शिकवताना टिव्ही, मोबाईल, प्रोजेक्टर इ. साधनांचा उपयोग करतात. त्यामुळे शिकणे अगदी सोपे व परिणामकारक होते. जे विद्यार्थ्यांच्या स्मरणात चिरकाल लक्षात राहते. शाळेची गुणवत्ता उत्तम आहे. शिष्यवृत्ती परीक्षा जादा तास, मंथन परीक्षा, नवोदय परीक्षा यासाठी शिक्षक शाळेव्यतिरिक्त जादा वेळ थांबून परीक्षेची तयारी करून घेतात. शाळेच्या भौतिक सुविधा यामध्ये परसबाग, रंगमंच, मैदान, सभागृह, फिल्टर पाणी, खेळणी, इ.उत्तम सोयी उपलब्ध आहेत. विद्यार्थी शिकत नसून भावी सुजाण नागरिक ही शाळा घडवते. आमच्या गावात ही शाळा आहे याचा पालक म्हणून आम्हाला अभिमान वाटतो, असे पालक सोमनाथ पेढेकर यांनी सांगितले.
शाळा हे माझे ज्ञानमंदिर आहे. या शाळेने मला घडविले. या शाळेत मी शिकलो, लहानाचा मोठा झालो. त्याच शाळेमध्ये मी आज मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. शाळा व त्यामधील विद्यार्थी माझे दैवत आहेत. विद्यार्थी आहेत म्हणून मी आहे. शाळेतून अनेक विद्यार्थी शिकून गेले. डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, अधिकारी म्हणून काम करत आहेत. शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, शाळेचा निकाल दरवर्षी उंचावत आहे. त्यामुळे पालक वर्ग या शाळेत पाल्याचा प्रवेश घेत आहे. पालकसंपर्क, माजी विद्यार्थी, पालकांची जागरूकता, विनामूल्य प्रवेश, सर्व शैक्षणिक सुविधा मोफत, दर्जेदार शिक्षण यामुळे दरवर्षी शाळेची पटसंख्या झपाट्याने वाढत आहे. शाळेला लागूनच अनुदानित शाळा आहे. तरीही पालक वर्ग आपल्या शाळेत मुलाचा प्रवेश घेत आहेत. ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे, अशी भावना मुख्याध्यापक रविंद्र पवार यांनी व्यक्त केली.