मुंबई: कालच अंदमानात मान्सूनचं आगमन झालं आहे. तब्बल सहा दिवस आधीच मान्सून अंदमानात पोहोचलाय. त्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. अंदमानात लवकर हजेरी लावल्यामुळं आता राज्यातही वरुणराजाचं लवकर आगमन होणार आहे.
कालच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. तर 27 मे रोजी तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. आता आहे तशीच स्थिती अनुकूल राहिल्यास मान्सून 6 जूनला मुंबईत तर 11 जूनला मराठवाड्यात पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच, 11 जूनपर्यंत मान्सून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात धडकण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी खंड पडल्यानं 10 जुलैपर्यंत या भागांत मान्सूनची प्रतीक्षा करावी लागली होती. त्या तुलनेत यंदा महिनाभर आधीच वरुणराजाचं आगमन होण्याचे संकेत आहेत.
महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट
दरम्यान, कोकण किनारपट्टीसह राज्यातील नऊ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह, मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पश्चिम बंगाल आणि ईशान्यकडील सात राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याची माहिती देखील हवामान तज्ञांनी दिली आहे. पावसासाठी अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवास सुकर झाला आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज आहे.