आरती अंकलीकर-टिकेकर यांचे प्रतिपादन
ठाणे: भारतीय शास्त्रीय संगीत अनुपम असून संपूर्ण जगात नाही, हे आपले फार मोठे सामर्थ्य आहे. तेव्हा, सध्याच्या वेगवान आयुष्यात मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी, शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर- टिकेकर यांनी केले.
ठाण्यातील सरस्वती क्रिडा संकुलाच्या प्रांगणात आठवडाभर सुरु असलेल्या ३९ व्या कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी (दि.१४ जाने.) गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या मुलाखतीने झाला. माधुरी ताम्हाणे यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहीत, माजी नगरसेवक सुनेश जोशी, सौ.कमल संजय केळकर, ॲड.स्वाती दिक्षित-आवटी, प्रा.किर्ती आगाशे, सुहास जावडेकर आदीसह शेकडो रसिक श्रोते उपस्थित होते.
आरती अंकलीकर-टिकेकर यांनी मुलाखतीत अनेक सांगितीक किस्से, तसेच बालपणीपासुनच्या संगीत प्रवासातील आठवणींचा पट उलगडला. आपल्या सांगितिक वाटचालीत आई-वडील आणि गुरुंसोबतच लहानपणी साधना सरगमचाही मोठा सहभाग असल्याचे स्पष्ट केले. मनातील विचार सुरांच्या माध्यमातुन प्रकट करण्यासाठी गायकाला तल्लख बुद्धीमत्ता, भावनिक भागांक आणि उत्तम गणिताबरोबर सांगितीक बुध्दयांक देखील आवश्यक असल्याचे नमुद करीत हे सर्व असेल तरच गाण्याचा रस्ता धरा… असा उपदेश केला. गायनकला समृद्ध करण्यासाठी रियाज हा करायलाच हवा, किंबहुना रियाज करताना शरीर, मन आणि मेंदु हे तीनही गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
संगीत क्षेत्रात जितका गुरु महत्वाचा त्यापेक्षा शिष्याची तळमळ आणि प्रतिभा महत्वाची आहे, तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांची एकाग्रता, त्यांच्या मनाचे स्थैर्यदेखील महत्वाचे आहे.आजकाल वेगवान आयुष्यात आपण सगळे २१० च्या वेगाने पळतोय, आपली मनं तर ५०० च्या वेगाने आणि आपले शरीर तर नुसते धावत सुटले आहे. तेव्हा, मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज असल्याचे सांगितले. कारण शास्त्रीय संगीत हा एक प्रकारे योग असून ध्यानाची (मेडीटेटीव) लय आहे आणि हे अनुभवयालाच हवे, असा आग्रह त्यांनी केला.
लतादीदी, आशाताईंच्या गाण्यांचा उल्लेख करून त्यांनी, गुरु पं. वसंतराव कुलकर्णी, गायिका किशोरी आमोणकर, तसेच पं. भीमसेन जोशी, संगीतकार श्रीधर फडके आदीसमवेतच्या गानप्रवासातील आठवणींचे सप्तक रसिकांसमोर उलगडले. तब्बल दोन तास रंगलेल्या या मुलाखतीमुळे मी केलेले निग्रह आणि निश्चय पुन्हा रिफ्रेश झाल्याची प्रांजळ कबुलीही आरती अंकलीकर-टिकेकर यांनी दिली.
मुलाखतीमध्ये आरती अंकलीकर यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवता उत्तरे दिली. आरती यांनी त्यांचे पती अभिनेता उदय टिकेकर यांच्या लव्हस्टोरीचा किस्साही सांगितला. गेल्या वर्षी याच ठिकाणी आरतीताई येणार होत्या, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तेव्हा येऊ शकल्या नाहीत, मात्र गतवर्षी न जुळलेले हे सूर यावर्षी जुळले. अशी आठवण जागवत संपूच नये अशा वाटणाऱ्या या दिलखुलास गप्पांना माधुरी ताम्हाणे यांनी विराम दिला.