बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना जाहीर पाठिंबा
मुंबई: राज्यात महाविकास आघाडी आणि वंचितची जागावाटपाची चर्चा फिस्कटल्यानंतरही वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. वंचित आघाडीने पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केली आहे तर बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. बारामतीमध्ये आपण उमेदवार देत नसल्याचे स्पष्ट करत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचितकडून महाविकास आघाडीसोबत मैत्रिपूर्ण लढत होत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. कारण या आधीही वंचितकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आणि गडकरींचे विरोधक उमेदवार काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
वंचितने या आधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या. आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्यातील धडाडीचे नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी या आधी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती. त्याच दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांचीही भेट घेतली होती. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज मोठ्या प्रमाणात नाराज असल्याचे दिसत आहे. त्याचमुळे आता वंचितच्या वतीने वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्या माध्यमातून पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात मराठा मतं आकर्षित करण्याचा मानस असल्याचे दिसत आहे..
वंचित बहुजन आघाडीने कोल्हापुरात उमेदवार न देता काँग्रेसचे शाहू महाराज यांना पाठिंंबा जाहीर केला आहे. त्याचवेळी नागपुरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या विरोधात निवडणूक लढणारे काँग्रेसचे विकास ठाकरे यांनाही पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे.