ठाण्यात घरोघरी जाऊन करणार लसीकरण

ठाणे : मागील काही दिवसापासून शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढू लागली आहे. तसेच चौथ्या लाटेचा धोका देखील लक्षात घेऊन मागील काही महिने संथ गतीने सुरु असलेली लसीकरण मोहीम आता पुन्हा वेगाने सुरु करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यापुढेही जाऊन पुन्हा घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबविण्यास पालिकेने सुरुवात केली आहे.

या मोहीमेला ‘हर घर दस्तक २’, असे नाव देण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील ३० आरोग्य केंद्राच्या माध्यामतून लसीकरण न केलेले, तसेच दुसरा व बुस्टर डोस राहिलेल्या नागरिकांचे लसीकरण घरोघरी जाऊन करण्यात येणार आहे. १ जून ते ३१ जुलै याकालावधीत ही मोहीम राबवली राबविली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरी भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच केंद्र व राज्य शासनाने देखील लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेने लसीकरणापासून वंचित असलेल्यांना लस मिळावी यासाठी हर घर दस्तक २ ही मोहीम राबविण्यास सुरवात केली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील लसीकरणाला गती मिळावी, तसेच नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे या उद्देशाने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या कालावधीत हर घर दस्तक २ ही मोहीम राबविण्यास सुरवात झाली आहे. या मोहिमेसाठी ठाणे महानगर पालिकेच्या ३० आरोग्य केंद्राच्या मध्यातून प्रत्येकी एक पथक कार्यरत असणार आहे. यामध्ये एक परिचारिका, अशा वर्कर आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा समावेश असणार आहे. या पथकामार्फत घरोघरी जाऊन लसीकरणाचा सर्व्हे केला जाणार आहे. ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना तत्काळ त्याच ठिकाणी लस दिली जाणार आहे. त्यामुळे पहिला, दुसरा आणि बुस्टर डोस न घेतलेल्यांना आता या मोहिमेंतर्गत घर बसल्या लस मिळणार आहे.
दरम्यान, बुधवार १ जून रोजी शहरातील पालिकेच्या चार ते पाच केंद्रांमार्फत ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर, अन्य केंद्रांवरील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असून २ जूनपासून सर्वच ३० केंद्राच्या माध्यामतून या मोहिमेला सुरु वात होणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने देण्यात आली.