आजपासून ठाण्यात नऊ ठिकाणी लसीकरण

ठाणे : ठाणे शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग संपुष्टात आला असला तरी खबरदारी म्हणून ठाण्यात नऊ ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू केली जाणार असून कोव्हीशिल्ड लशीचे सहा हजार डोस ठाणे महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत.

केंद्र सरकारने राज्यात लसीकरण मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले होते, परंतु कोव्हीशिल्ड लस उपलब्ध नसल्याने पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या ठाणेकर लशीच्या प्रतिक्षेत होते. आज सुमारे सहा हजार डोस उपलब्ध झाल्याने उद्या सकाळी १८ वर्षावरील नागरिकांना पहिला,दुसरा आणि बूस्टर डोस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, सी.आर. वाडिया हॉस्पिटल, पार्किंग प्लाझा, कौसा आरोग्य केंद्र, किसननगर, शीळ, लोकमान्यनगर, रोजा गार्डन आणि मानपाडा या आरोग्य केंद्रांवर दिला जाणार आहे.

ठाण्यातील १००टक्के नागरिकांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे, परंतु बूस्टर डोसला जास्त प्रतिसाद मिळाला नाही. कोरोना पुन्हा येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकारने बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. ठामपा हद्दीत सध्या केवळ एक सक्रिय रूग्ण आहे.