ठाणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी (इंदिसे)चे राष्ट्रीय सरचिटणीस तथा ठामपाच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य उत्तम खडसे यांचे आज (दि.27) पहाटे अल्पशः आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मूळचे वाशीम जिल्ह्य़ातील असलेले उत्तम खडसे हे नोकरीनिमित्त ठाण्यात स्थायिक झाले होते. नोकरी करीत असतानाच ते नानासाहेब इंदिसे यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी स्वतःला आंबेडकरी चळवळीत झोकून दिले होते. रिडल्स आणि नामांतर लढ्यात त्यांचे मोठे योगदान होते.
गेल्या चार दिवसांपासून ते आजारी होते. मानपाडा येथील लाईफ केअर रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर वागळे इस्टेट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आंबेडकरी चळवळीतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.