गर्दीत मास्क वापरा; नियमांचे पालन करा

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ठाणे : सध्या काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवे रुप समोर येत आहे. बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाचा हा नवा व्हेरियंट ठाणे जिल्ह्यात पसरू नये व त्यावर प्रतिबंधक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, तसेच कोवीड संदर्भातील सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना या विषाणूचे संसर्गबाधित रुग्ण आढळत असून विमान प्रवासाद्वारे प्रवासी भारतात सर्वत्र प्रवास करीत आहेत. हे प्रवासी ठाणे जिल्ह्यामध्येही येत आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे ठाणे जिल्ह्यापासून जवळ असल्याने जिल्ह्यात कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोव्हिड संदर्भातील सुचनांचे पालन करावे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, वेळोवेळी साबण, सॅनिटायजर तसेच हॅन्डवॉशने हात स्वच्छ धुणे, खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल, टिश्यु धरणे, नियमितपणे सॅनिटायजरचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करावे, सर्व नागरिकांनी लसीकरण पूर्ण करुन बूस्टर डोस घ्यावा, हात स्वच्छ न धुता डोळे, नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळावे, आजारी वाटल्यास किंवा लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, नियमित व्यायाम करणे, सकस आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.