इंद्रधनू मानबिन्दू पुरस्कारामुळे मिळाली शतक झळकावण्याची उर्मी- बल्लाळ

ठाणे: ठाण्याच्या जडणघडणीत प्रत्यक्ष सहभाग असणारे आणि या शहराच्या संक्रमणाचे साक्षीदार राहिलेले ज्येष्ठ पत्रकार ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांना प्रतिष्ठेचा इंद्रधनू मानबिन्दू पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आवर्जून उपस्थित होते. ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनीही हजेरी लावल्यामुळे सोहळा दिमाखदार झाला. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र अमृतकर अध्यक्षस्थानी होते. या समारंभास इंद्रधनू परिवाराचे सदस्य आणि श्री.बल्लाळ यांचे चाहते अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

मुंबईच्या सावलीत वर्तमानपत्र काढणे आणि ५० वर्षे सातत्याने चालवणे असे आव्हानात्मक काम ‘ठाणेवैभव’ करत आहे. याबद्दल श्री. फणसळकर यांनी कौतुक केले. पत्रकारितेला सामाजिक बांधिलकीचा आयाम देऊन श्री.बल्लाळ यांनी पावित्र्य जपले आहे. इंद्रधनूने योग्य माणसाची निवड केली, असेही ते म्हणाले.

श्री. डुंबरे यांनी ठाण्याच्या सर्व विधायक उपक्रमांत श्री.बल्लाळ घेत असलेल्या सहभागाचा उल्लेख केला. आदर्श पत्रकारिता त्यांनी जोपासली, असे ते म्हणाले.

श्री. खांडेकर यांनी ‘ठाणेवैभव’चा प्रवास जवळून पाहिल्याचे सांगत श्री.बल्लाळ यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले. सार्वजनिक जीवनात प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करीत असतात. ही जबाबदारी श्री.बल्लाळ नेटाने सांभाळत आहेत, असे ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना श्री.बल्लाळ यांनी इंद्रधनूचे आभार मानले. आणि हा पुरस्कार सुवर्ण महोत्सवी वर्षात दिल्याने नवीन प्रयोग करण्याची ऊर्जा वाढली आहे, असे सांगितले. १९७५ मध्ये ‘ठाणेवैभव’ची सुरुवात झाली आणि आपल्या पत्रकारितेलाही चार दशके झाली, असे सांगून श्री.बल्लाळ म्हणाले की विश्वासार्ह आणि विधायक पत्रकारिता ही कितीही आव्हाने आली तरी टिकून राहत असते. ‘ठाणेवैभव’च्या माध्यमातून अनेक नवीन प्रयोग करून मराठी वाचकांप्रमाणेच बहुभाषिक वाचकांनाही सामावून घेतले गेले, असे सांगितले. ‘नो युअर टाऊन’ आणि अनेक नियतकालिके काढून नवनवीन वाचक निर्माण करण्याचा प्रयत्न अखंडपणे सुरू आहे आणि ही प्रक्रिया या पुरस्कारामुळे अधिक वेगवान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एखादा फलंदाज ५० धावा पूर्ण करतो तेव्हा खेळपट्टीवर ड्रिंक्स घेऊन खेळाडू जातो, पण खरे तर तो कर्णधाराचा निरोप घेऊन गेलेला असतो. तो असा असतो की जम बसला आहे, आता शतक ठोकायचे. इंद्रधनूने मानपत्राद्वारे नेमका हाच निरोप दिला आहे आणि विशेष म्हणजे मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मानबिन्दू देऊन दिला आहे. आम्ही त्यांचा विश्वास सार्थकी ठरवू, असे सांगताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.