अंबरनाथच्या शिवमंदिरात दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी

अंबरनाथ : आज पहिल्याच श्रावणी सोमवारी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची दर्शनासाठी अभूतपूर्व गर्दी झाली आहे. सकाळपासून दर्शनासाठी मंदिर परिसर आणि बाहेर भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

कोरोनाच्या संकट काळामुळे इतर मंदिरांप्रमाणे शिवमंदिर देखील भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. यंदा मात्र श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मंदिराकडे मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. यावर्षी दरवेळेपेक्षा भाविकांची तिप्पट गर्दी झाल्याचे मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने सांगण्यात आले.

शिवमंदिराच्या प्रांगणात खास श्रावण महिन्यानिमित्त श्रावणमास हिंदू धर्म महोत्सव समितीच्या वतीने महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अखंड श्रावण महिना रोज दुपारी महाप्रसाद वाटप केले जाते. गेल्या २१ वर्षांपासून विजय पाटील, रवी पाटील, युवराज पाटील, रुद्रराज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त महोत्सव आयोजित केला जातो. या काळात भजन, किर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी ह. भ. प. विश्वनाथ महाराज वारिंगे, ओमी साई, बापूजी महाराज आणि बटुकजी महाराज यांची कीर्तने, प्रवचने होणार आहेत.

अंबरनाथ आणि परिसरातील विविध क्षेत्रातील युवक आणि नागरिक स्वतःहून हिरीरीने सहभागी होऊन महिनाभर सेवाकार्य करतात असे विजय पाटील यांनी सांगितले.