नागरीकांच्या तक्रारींकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष?
नवी मुंबई: नवी मुंबई शहरात इमारतीवर मोबाईल टॉवर बसवण्यास अजून अधिकृत परवानगी दिली जात नाही. त्यामुळे मोबाईल कंपन्यानी आपला मोर्चा अनधिकृत इमारतींकडे वळवला आहे. अशा बांधकामांवर
मनपा अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अवैध मोबाईल टॉवर उभारले जात आहेत.
.
नवी मुंबई शहरातील अनेक अनधिकृत इमारतींवर मोबाईल टॉवर असून याकडे मनपा प्रशासन डोळेझाक करीत असल्याने एक प्रकारे महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे, असे दिसून येत आहे. नवी मुंबईतील गावठाण तसेच खोपडपट्टी भागातील, अनेक अनधिकृत इमारतीवर मोबाईल टॉवर असून त्यातून बाहेर पडणार्या रेडिएशनमुळे त्रास होऊन अनेकांना मोठमोठ्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. यात मोठ्या मोबाईल कंपन्यांनी शहरात घुसखोरी केली असून अवैधपणे बांधकाम व्यवसायिकांना पैशांचे आमिश दाखवून अनेक अनधिकृत इमारतींवर अवैध मोबाईल टॉवर उभारले जात आहेत. घणसोली गावात देखील असाच प्रकार समोर आला आहे. येथील सेक्टर १६, मीनाक्षी ऑटो मोटिव्ह समोरील एका इमारतीवर मोबाईल टॉवर बसवण्याचे काम सुरू होते. याबाबत येथील रहिवासी शीतल पाटील यांनी मागील एक आठवड्यापासून सदर मोबाईल टॉवरचे काम थांबवण्यासाठी तक्रारी केल्या आहेत. मात्र या टॉवरचे काम पूर्ण होऊन देखील मनपा प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे मोबाईल टॉवर उभारणीत मनपा अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद आहे का?असा सवाल करत भविष्यात जर या टॉवरमुळे कुठली दुर्घटना घडली तर त्यास सर्वस्वी मनपा अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल,अशा इशारा देखील शीतल पाटील यांनी दिला आहे.
———————————
एखाद्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभा करायचा असेल तर सोसायटीचे संमती पत्र, इमारतीचे बांधकाम परवाना, भोगवटा प्रमाणपत्र तसेच संरचना परीक्षण अहवाल लागतो. तर इमारतींवर मोबाईल टॉवर बसवण्याबाबत केंद्र शासनाने राज्य शासनाला दिलेल्या सूचनांनुसार काम सुरू आहे. काही तांत्रिक अडचणी पार केल्यानंतर शहरात मोबाईल टॉवर बसवण्याची परवानगी प्रकिया सुरू केली जाणार आहे. तूर्तास शहरात अशा परवानग्या बंद असून अनधिकृत इमारतीवर देखील दिल्या मोबाईल टॉवर बसवण्याची देत नाहीत, अशी माहिती नगर रचना विभागाचे उपायुक्त किरण खंदारे यांनी दिली.