सक्रिय रुग्ण हजाराखाली; रुग्णालयात फक्त ५३जण

ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. आज ५५ नवीन रुग्णांची भर पडली असून १९० रोगमुक्त झाले आहेत. रुग्णालयात आणि घरी ८१० रुग्ण उपचाराधीन आहेत. आज एक जण दगावला असून शहरातील रुग्णालयात अवघ्या ५३ जणांवर उपचार सुरू आहेत.

महापालिका हद्दीतील माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वाधिक २० रूग्ण सापडले आहेत. ११ जण वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये मिळाले आहेत. सहा रूग्ण उथळसर आणि पाच रूग्ण लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती भागात वाढले आहेत. प्रत्येकी तीन रूग्ण नौपाडा-कोपरी आणि वागळे प्रभाग समिती परिसरात नोंदवले गेले आहेत. कळवा आणि दिवा येथे प्रत्येकी दोन रुग्णांची भर पडली आहे तर सर्वात कमी एक रूग्ण मुंब्रा येथे सापडला आहे. दोन रुग्णांच्या घरचा पत्ता मिळू शकला नाही.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांपैकी १९०जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८०,०५६ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ८१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक रूग्ण दगावला असून आत्तापर्यंत २,१२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील १,७१८ नागरिकांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये ५५जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ६०,२२९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८२,९९० नागरिक बाधित सापडले आहेत.